– मध्यरात्रीच्या गस्तीदरम्यान ‘डीबी’ पथकाने आवळल्या मुसक्या; ४० हजारांचा मुद्देमाल जप्त
हंसराज,भंडारा :- भंडारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाने मध्यरात्री गस्तीवर असताना एका संशयित आरोपीला अटक करून त्याच्याकडून बेकायदेशीर पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. हा आरोपी नागपूर येथील रहिवासी असून, त्याच्याकडून एकूण ४०,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
१५ मे रोजी मध्यरात्री सपोनि आशिष बोरकर, रात्रगस्त अधिकारी सपोनि राजेश खंडाडे आणि डी.बी. पथकातील पोलीस अंमलदार खासगी वाहनाने शहरात पेट्रोलिंग करत होते. जिल्हा परिषद चौक परिसरात पोहोचले असता, ‘सरगम बार’च्या मागे विदर्भ हाऊसिंग बोर्ड कॉलनीच्या गल्लीत एक व्यक्ती संशयास्पदरित्या वावरत असून त्याच्याकडे अग्निशस्त्र असल्याची खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने या भागात शोधमोहीम राबवली. आनंदा किराणा दुकानाच्या बाजूला संशयित व्यक्ती पोलिसांना आढळून आली. पंचांसमक्ष त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपले नाव शेख अतिफ शेख लतिफ (वय ३२, रा. शांतीनगर घाट, नागपूर) असे सांगितले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला पॅन्टमध्ये डाव्या बाजूला एक पिस्तूल खोचलेले आढळले. या पिस्तुलाच्या मॅगझीनमध्ये एक जिवंत काडतूसही सापडले.
अग्निशस्त्राबाबत परवाना विचारला असता, आरोपीने कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. पोलिसांनी ४० हजार रुपये किमतीचे पिस्तूल आणि ५०० रुपयांचे काडतूस असा एकूण ४०,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सपोनि आशिष बोरकर यांच्या तक्रारीवरून भंडारा शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आशिष बोरकर, सपोनि राजेश खंडाडे, पो.शि. राठोड आणि पो.शि. अंबादे यांनी केली. या घटनेचा पुढील तपास भंडारा पोलीस करत आहेत.