– नाशिक नगरमधील घटना; वृद्ध महिला मुलीकडे गेल्याची संधी साधत चोरट्यांनी साधला डाव
हंसराज, भंडारा :- भंडारा शहरातील नाशिक नगर, लाला लजपतराय वॉर्ड परिसरात एका वृद्ध महिलेच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ६ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धाडसी घटना उघडकीस आली आहे. या चोरीमध्ये १ लाख २० हजार रुपयांच्या रोख रकमेसह मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा समावेश असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपाली अनिल खोब्रागडे (वय ७० वर्षे, रा. नाशिक नगर, भंडारा) या १३ मे रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास आपल्या घराच्या दरवाजाला कुलूप लावून मुलीसोबत मौजा अड्याळ येथे मुक्कामी गेल्या होत्या. हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घराच्या समोरील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी आणि लाकडी कपाटाचे लॉकर तोडून त्यातील सर्व ऐवज लंपास केला.
१४ मे रोजी सकाळी ८:३० वाजता जेव्हा फिर्यादी घरी परतल्या, तेव्हा त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश करून पाहिले असता, बेडरूममधील सामान अस्ताव्यस्त फेकलेले होते आणि कपाटाचे लॉकर उघडे होते. लॉकरमध्ये ठेवलेली १ लाख २० हजार रुपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
चोरट्यांनी १ लाख २० हजार रुपये रोख रकमेसोबतच १ लाख ६० हजार रुपये किमतीची १६ ग्रॅमची सोन्याची चेन, १ लाख २० हजार रुपयांची १२ ग्रॅमची सोन्याची चेन, १ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे सहा जोड रिंग (१८ ग्रॅम), तसेच चांदीचे कडे, पायपट्या आणि छल्ले असा एकूण ५ लाख ५० हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. रोख रक्कम आणि दागिने मिळून एकूण ६ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
याप्रकरणी दीपाली खोब्रागडे यांनी भंडारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५, ३३१(४) अन्वये गुन्हा क्रमांक १०९४/२०२६ नुसार गुन्हा नोंदवला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडाडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.