spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तीर्थक्षेत्र विकासकामे दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत पूर्ण करावीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटींच्या कामांना मान्यता

मुंबई :- राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या जतन व संवर्धनास शासनाचे प्राधान्य असून तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच भाविक-पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधासह आरोग्यसुविधाची उपलब्धता करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी दिले. यावेळी शिखर समितीच्या बैठकीत सहा तीर्थक्षेत्र विकासासाठी एकूण ९९३.७२ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना आणि निधीला मंजुरी देण्यात आली.

सह्याद्री अतिथीगृह येथे विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार,वनमंत्री गणेश नाईक, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले,आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार धनंजय मुंडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह सर्व संबंधित अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री क्षेत्र भीमाशंकर आदर्श गाव विकासाठी १७२ कोटींची तरतुद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग क्षेत्राच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी कामे करावीत.या विकास आराखड्याअंतर्गत अत्याधुनिक बस स्थानक आणि पार्किंग सुविधा करण्यात यावी. या कामांसाठी जागांचे भूसंपादन वेळेत करावे. या प्रकल्पासाठी सुमारे १७२.२२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे मे २०२७ पर्यंत काम पूर्ण करावे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध वळण रस्ते आणि रस्ते रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात यावीत. सध्या २.७ मीटर रुंदी असलेले रस्ते ७ मीटरपर्यंत रुंद करावा. भक्त आणि पर्यटकांच्या सुविधांसाठी मंदिर परिसरात पादचारी मार्ग, कव्हर्ड कॉरिडॉर, फ्लोअरिंग आणि एम्फीथिएटर, २५७ केएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, नवीन पोलीस स्टेशन आणि विश्रामगृह, भविष्यातील विकास आराखड्यांतर्गत डिंभे धरण परिसरात सबस्टेशन उभारणे, केबल कार (रोपवे) सुविधा सुरू करणे, एमटीडीसीच्या भीमाशंकर रिसॉर्टचा विकास करणे, राजापूर येथे नव्या पर्यटन सुविधांची निर्मिती करण्याचे नियोजन काटेकोरपणे करावे. आमदार बाबाजी काळे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर आदर्श गाव विकास आराखड्यात सूचना केलेल्या कामांचा आराखड्यात समावेश करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्या.

संत तुकाराम महाराज जन्मस्थानाच्या संवर्धनासाठी ४१ कोटींची तरतूद

संत तुकाराम महाराज यांचे देहू येथील जन्मस्थान, वैकुंठगमन मंदिर परिसर तसेच भंडारा डोंगर परिसराच्या संवर्धन आणि विकासासाठी सर्वंकष आराखडा ४१.७१ कोटींचा आहे. या आराखड्यात संत तुकाराम महाराज जन्मस्थान मंदिर, वैकुंठगमन स्थळ, भंडारा डोंगर आणि परिसरातील इतर धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करावे. यामध्ये रस्त्यांचे सुशोभीकरण, स्वच्छता व्यवस्था, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, पार्किंग व्यवस्था, भाविकांसाठी निवास सुविधा तसेच माहिती केंद्र उभारणे, भंडारा डोंगर परिसरात हरित क्षेत्र संवर्धन, वृक्षारोपण आणि नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. आमदार सुनिल शेळके यांनी संत तुकाराम महाराज जन्मस्थानाच्या संवर्धन आराखड्यात सूचविलेल्या कामांचा आराखड्यात समावेश करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

किल्ले अजिंक्यतारा जतन आणि संवर्धनासाठी १३४.८० कोटींची तरतूद

सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले अजिंक्यताराचे जतन, संवर्धन आणि परिसर सुशोभीकरणासाठी १३४.८० कोटी रूपयांचा विकास आराखडा आहे. यामध्ये नियोजित असलेल्या पायाभूत सुविधांचा विकास, नियोजित प्रेक्षक गॅलरी, नवे पादचारी मार्ग व लँडस्केपिंग,राज सदरेचे पुनरुज्जीवन, बुरूजांचे संवर्धन, पर्यटन आकर्षणे,अत्याधुनिक लटकता पूल,स्वच्छता व विश्रांती गृहांची कामे, तज्ज्ञांचे मार्गदर्शनाखाली नियोजित कामे वेळेत पार पाडावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

संगम माहुली (सातारा) समाधी स्थळ संवर्धन प्रकल्पासाठी १३३ कोटींची तरतुद

संगम माहुली समाधीस्थळ संवर्धनासाठी १३३ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळांचा जीर्णोद्धार आणि लँडस्केप विकास केला जाणार आहे. याशिवाय, ऐतिहासिक संगमेश्वर मंदिर व घाटाचे संवर्धन, नवीन हँगिंग ब्रिज (झुलता पूल), व्ह्यूइंग गॅलरी आणि सुसज्ज पाथवेची निर्मिती करून या परिसराला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनविण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखडा (वेरुळ)साठी २१० कोटी रूपयांची तरतुद

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ येथील प्रसिद्ध घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या विकासासाठी सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत आता २१०.४५ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आली असून, यामध्ये ५३.८२ कोटींच्या वाढीव निधीची मागणी समाविष्ट आहे. सध्या या ठिकाणी भाविकांसाठी अत्याधुनिक भक्त निवास, दर्शन बारी (प्रतीक्षागृह), शॉपिंग कॉम्प्लेक्स, फंक्शन हॉल, घाट आणि १.६ किमीचा बाह्य वळण रस्ता (बायपास रोड) यांसारखी कामे गतीने करावीत, असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परिसर विकासासाठी ३०१.५४ कोटींची तरतुद

‘श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर’ परिसर मूळ आराखड्यातील पुढील नवीन कामांसाठी सुमारे ३०१.५४ कोटी रुपयांचा अतिरिक्त आराखडाही तयार करण्यात आला आहे. तीन टप्प्यात या मंदिराची कामे वेळेत पूर्ण करावीत. पहिला टप्पा (मुख्य मंदिर परिसर) विकासामध्ये भव्य प्रवेशद्वारे, डिजिटल रांग व्यवस्था, प्रतीक्षागृहे, अन्नछत्र, योग-ध्यान केंद्र आणि मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण,दुसरा टप्पा (तीर्थ व पुरातन स्थळे): हरिहर व मार्कंडेय तीर्थांचे वैज्ञानिक पुनरुज्जीवन, घाट, सायकल ट्रॅक, दिव्यांगसुलभ सुविधा, फूड कोर्ट आणि सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था उभारणे. तिसरा टप्पा (मेरू पर्वत विकास) मेरू पर्वतावर भव्य शिवमूर्ती, शिवपुराण व वैदिक संग्रहालय, ॲम्फीथिएटर, लेझर लाईट अँड साऊंड शो आणि ध्यानस्थळे विकसित करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

पुण्याचे जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर आदर्श गाव विकास आराखडा व संत तुकाराम महाराज जन्मस्थान संवर्धन विकास आराखड्याचे सादरीकरण केले. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखडा व श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परिसर विकास आराखड्याचे सादरीकरण केले. किल्ले अजिंक्यतारा जतन आणि संवर्धन व संगम माहुली (सातारा) समाधी स्थळ संवर्धन आराखडाचे सादरीकरण साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सादर केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.