spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

“सावधान! भंडारा पोलिसांच्या रडारवर ३८२ गुन्हेगार; ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक नाकाबंदी”

हंसराज, भंडारा :- आगामी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींवर वचक निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन आणि अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण जिल्ह्यात मोठी प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल ३८२ सराईत गुन्हेगारांची एकाच वेळी ‘ओळख परेड’ घेण्यात आली. पोलीस प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे.

सण आणि उत्सवाच्या काळात जिल्ह्यात शांतता व सामाजिक सलोख्याचे वातावरण राहावे, तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये, या उद्देशाने ही विशेष मोहीम आखण्यात आली होती. या धडक मोहिमेमध्ये भंडारा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक मयंक माधव आणि दोषसिद्धी कक्षाचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत यांच्यासह जिल्ह्यातील सर्व स्थानिक पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पाचारण करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने शरीराविरुद्ध गंभीर गुन्हे करणारे, मालमत्तेची चोरी, घरफोडी, अवैध दारू विक्री, जुगार, एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असलेले आरोपी, पोलिसांच्या निगराणीखालील बदमाश आणि ‘टू प्लस’ (दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेले) यादीतील सराईत गुन्हेगारांचा समावेश होता.

गुन्हेगारांना पोलिसांचा ‘सज्जड दम’ ओळख परेड दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व ३८२ गुन्हेगारांच्या सध्याच्या हालचाली आणि वर्तणुकीची कसून तपासणी केली. यावेळी वारंवार गुन्हे करणाऱ्या या सराईतांना सक्त ताकीद देण्यात आली. “सणाच्या काळात कुठेही शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास किंवा गुन्हेगारी कृत्य आढळल्यास थेट कडक कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच, प्रतिबंधात्मक कारवाई आणि त्यानंतर होणाऱ्या पुढील कडक कायदेशीर प्रक्रियेची पूर्ण जाणीवही त्यांना करून देण्यात आली.

नागरिकांना निर्भय राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने उचललेल्या या पावलामुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली असून सामान्यांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढली आहे. नागरिकांनी निर्भयपणे ईदचा सण साजरा करावा, जिल्ह्याच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन २४ तास सज्ज असल्याची ग्वाही पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी दिली आहे.

Popular Articles