spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बिल न भरल्याने मोहाडीचे सीसीटीव्ही ‘ब्लॅकआऊट’; सामाजिक कार्यकर्ते उमेश मोहतुरे आक्रमक, प्रशासनाला दिला इशारा!

हंसराज,भंडारा मोहाडी :- मोहाडी नगर पंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील सीसीटीव्ही कॅमेरे बिल न भरल्यामुळे बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एकीकडे शहरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना, दुसरीकडे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली यंत्रणाच बंद असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सीसीटीव्ही बंद, पोलीसही हतबल शहरात वाढत्या चोरीच्या घटनांवरून नागरिक संतप्त आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते उमेश मोहतुरे यांनी प्रशासनाच्या कारभारावर कडाडून टीका केली. मोहतुरे म्हणाले की, “आमच्या परिचयातील एका व्यक्तीच्या दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्यांनी साडेतीन लाख रुपये लंपास केले. दुर्दैवाची बाब म्हणजे, शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने चोरांचा माग काढणे पोलिसांना कठीण झाले आहे. पोलिसांना आता तपासासाठी खासगी दुकानांतील कॅमेऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे.” कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या मोहाडी पोलीस स्टेशनच्या परिसरातील कॅमेरेही बंद असणे, हे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे लक्षण असल्याचेही त्यांनी नमूद केले.

स्वच्छतेचाही बोजवारा केवळ सुरक्षाच नाही, तर शहराची स्वच्छता व्यवस्थाही पूर्णपणे कोलमडली आहे. गेल्या चार दिवसांपासून कचरा उचलणारी गाडी पोलीस स्टेशन परिसर आणि शहरातील काही भागांत फिरकलीच नाही. यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले असून, परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. नागरिकांकडून नियमित कर वसूल करूनही मूलभूत सोयीसुविधा देण्यात नगर पंचायत अपयशी ठरली आहे.

प्रशासनाला खडा सवाल “सीसीटीव्ही बंद… स्वच्छता बंद… मग प्रशासन नेमके सुरू तरी काय आहे?” असा संतप्त सवाल उमेश मोहतुरे यांनी उपस्थित केला आहे. केवळ मोहाडीच नव्हे, तर संपूर्ण भंडारा जिल्ह्यातील बंद सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने कार्यान्वित करावी, तसेच स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी मोहतुरे यांनी केली आहे.

Popular Articles