Home Latest News आरसीईआरटीच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागात क्विझ स्पर्धा व शैक्षणिक साइट व्हिजिटचे आयोजन

आरसीईआरटीच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागात क्विझ स्पर्धा व शैक्षणिक साइट व्हिजिटचे आयोजन

0
2

चंद्रपूर :- सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट), चंद्रपूर द्वारा संचालित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (RCERT), बाबूपेठ, चंद्रपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानवृद्धी व व्यावहारिक कौशल्य विकासाच्या दृष्टीने विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती, तांत्रिक ज्ञान आणि उद्योग क्षेत्राविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने विभागाच्या वतीने अल्ट्राटेक सिमेंट यांच्या सहकार्याने क्विझ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

सदर स्पर्धा अमोल जगताप (TMTC, चंद्रपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांना सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, बांधकाम साहित्य, गुणवत्ता नियंत्रण, काँक्रीट तंत्रज्ञान तसेच उद्योग क्षेत्रातील नव्या संकल्पनांवर आधारित प्रश्न विचारण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत आपले तांत्रिक ज्ञान सिद्ध केले.

विभागप्रमुख प्रा. एस. एन. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांमधून आत्मविश्वास वाढवून उद्योग क्षेत्रासाठी स्वतःला तयार करण्याचे आवाहन केले. तसेच प्रशिक्षण व प्लेसमेंट समन्वयक प्रा. अनुराधा बोढे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेतील सहभाग, नोंदणी प्रक्रिया तसेच करिअरच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्त्व पटवून दिले. स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

याच अनुषंगाने स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत दिनांक २0 मे २०२६ रोजी “जी+७ मजली न्यायालयीन इमारत बांधकाम प्रकल्प” येथे शैक्षणिक साइट व्हिजिटचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य व संयोजक डॉ. ए. झेड. चिताडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विभागप्रमुख प्रा. एस. एन. कुलकर्णी यांच्या नेतृत्वात यशस्वीरित्या पार पडला.

या शैक्षणिक भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी चंद्रपूर येथे सुरू असलेल्या जी+७ मजली न्यायालयीन इमारतीच्या बांधकाम स्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन आधुनिक बहुमजली इमारत बांधकाम पद्धती, स्ट्रक्चरल फ्रेमवर्क, फाउंडेशन सिस्टम, कॉलम-बीम डिझाईन, साइट मॅनेजमेंट, सुरक्षा उपाययोजना तसेच गुणवत्ता नियंत्रण प्रक्रियेचे बारकाईने निरीक्षण केले. यावेळी विद्यार्थ्यांना बांधकाम क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यपद्धती, साहित्य व्यवस्थापन, अभियंत्यांची जबाबदारी आणि प्रकल्प व्यवस्थापन याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

या उपक्रमासाठी प्रा. एस. जी. पडीशलवार व प्रा. अनुराधा एस. बोढे यांनी समन्वयक म्हणून कार्य केले. विद्यार्थ्यांनी या भेटीद्वारे प्रत्यक्ष बांधकाम क्षेत्रातील तांत्रिक बाबी जवळून अनुभवत शैक्षणिक ज्ञानासोबत व्यावहारिक माहिती आत्मसात केली.

या शैक्षणिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानात भर पडली असून उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभवामुळे त्यांच्या करिअर विकासाला निश्चितच दिशा मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com