spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

साकोलीतील थरारक खून प्रकरणाचा १२ तासांत उलगडा; ५ आरोपींना नागपुरातून बेड्या

– स्थानिक गुन्हे शाखा व साकोली पोलिसांची संयुक्त कारवाई; क्षुल्लक वादातून मित्राचीच केली हत्या

हंसराज,भंडारा साकोली :- साकोली शहरातील तलावाच्या काठावर झालेल्या ३० वर्षीय तरुणाच्या हत्येचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. साकोली पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने अवघ्या १२ तासांच्या आत तपास चक्रे फिरवून ५ आरोपींना नागपूर येथून अटक केली आहे. जिवलग मित्रांमध्ये झालेल्या क्षुल्लक वादातून ही हत्या झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

निखिल राजकुमार कांबळे (३०, रा. मुरपार-लेंडेझरी, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया) असे मृतकाचे नाव आहे. २२ मे २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजेच्या सुमारास साकोली तलावाच्या काठी निखिलचा रक्ताळलेला मृतदेह आढळून आला होता. त्याच्या छातीवर, मानेवर आणि डोक्यावर धारदार शस्त्राने भोसकल्याच्या गंभीर जखमा होत्या. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. साकोली पोलिसांनी तत्काळ घटनेची नोंद घेऊन भा.न्या.सा. २०२३ च्या कलम १०३ नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला.

खुनाचा सुगावा नसतानाही भेदला गुन्हा हत्येचा कोणताही प्रत्यक्ष पुरावा किंवा सुगावा नसताना, पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी स्थानिक गुन्हे शाखा व साकोली पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. तांत्रिक तपास आणि कौशल्यपूर्ण चौकशीच्या जोरावर पोलिसांनी आरोपींना शोधून काढले. आरोपी हे नागपूर येथे पळून गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे धाड टाकून ५ जणांना ताब्यात घेतले. गणेश मनोहर वलथेर (वय २०, रा. शिवाजी वार्ड, साकोली), सागर शंकर पारधी (वय १९, रा. शिवाजी वार्ड, साकोली), ओमकार सुनील मेश्राम (वय २१, रा. शिवाजी वार्ड, साकोली), कमलेश चुन्नीलाल कुकवास (वय २३, रा. मानेगाव, ता. लाखनी) यांच्यासह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा यात समावेश आहे.

शिवीगाळ ठरली मृत्यूला कारणीभूत पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत आरोपींनी गुन्हा कबूल केला. मृतक निखिल आणि आरोपी हे एकमेकांचे जिवलग मित्र होते. घटनेच्या वेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. यावेळी निखिलने केलेली शिवीगाळ आरोपींच्या मनाला लागली. याच रागाच्या भरात त्यांनी निखिलवर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला आणि घटनास्थळावरून पळ काढला.

पोलिसांची तत्परता अवघ्या १२ तासांच्या आत या ‘ब्लाईंड मर्डर’चा छडा लावल्याबद्दल जिल्हा पोलीस दलाचे कौतुक होत आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे , पो.नि. चिंचोळकर, पो.नि. आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व साकोली पोलीस स्टेशनच्या पथकाने केली. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजू साळवे करीत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.