– मुख्यमंत्री महोदयांची प्रेरणा डोळ्यांपुढे होती – डॉ. सागर पांडे
नागपूर :- अमरावती येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील अवघ्या तीन दिवसांच्या नवजात बाळावर जन्मजात हृदयविकार असल्याचे निदान झाले. बाळाच्या हृदयामध्ये छिद्र असल्याचे आढळल्याने गंभीरता लक्षात घेता तातडीच्या उपचारांची आवश्यकता निर्माण झाली होती. मुख्यमंत्री सहायता निधी जिल्हा कक्ष, अमरावती आणि नागपूर यांच्या तत्पर समन्वयामुळे बाळाला वेळेत वैद्यकीय मदत उपलब्ध झाली असून उपचारासाठी मोफत व्यवस्था करण्यात आल्याने कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
अचलपूर येथील मूळ रहिवासी असलेले हे कुटुंब मागील काही वर्षांपासून उदरनिर्वाहासाठी अमरावती येथे वास्तव्यास आहे. कुटुंबातील कर्ते पुरुष भाड्याने घेतलेली ऑटो रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तीन दिवसांपूर्वी त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला. मात्र जन्मानंतर लगेचच नवजात बाळाला हृदयाशी संबंधित गंभीर आजाराचे निदान डॉक्टरांनी केले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी बाळाला अमरावतीहून नागपूर येथील नेल्सन हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले.
त्या वेळी नवजात बाळ ऑक्सिजन सपोर्टवर होते. मात्र आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिकेचा खर्च परवडत नसल्यामुळे पालकांनी असमर्थता दर्शवली. त्याचवेळी रुग्णालयाकडून शस्त्रक्रिया तीन महिन्यांनंतरच होऊ शकणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कुटुंबासमोर मोठे संकट निर्माण झाले होते.
या परिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, अमरावतीचे डॉ. श्याम गावंडे यांनी मुख्यमंत्री सहायता निधी, विदर्भ व नागपूर विभागाचे सदस्य सचिव तथा प्रभारी अधिकारी डॉ. सागर पांडे यांच्याशी संपर्क साधून मदतीची विनंती केली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत डॉ. सागर पांडे यांनी तात्काळ रुग्णालय प्रशासनाशी समन्वय साधत नवजात बाळाला रात्रभर उपचारासाठी दाखल ठेवण्याची व्यवस्था केली. तसेच पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिकेद्वारे सुरक्षितपणे हलविण्याची व्यवस्था करण्यात आली. विशेष म्हणजे उपचार, दाखल प्रक्रिया तसेच रुग्णवाहिकेचा संपूर्ण खर्च मोफत करण्यात आला.
यासोबतच तीन महिन्यांनंतर आवश्यक असणारी शस्त्रक्रिया व पुढील उपचार मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. पांडे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या तातडीच्या समन्वयामुळे नवजात बाळाला वेळेत उपचार मिळाल्याने कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून या कार्याबद्दल डॉ. सागर पांडे यांनी मुख्यमंत्री महोदयांची प्रेरणा डोळ्यांपुढे ठेवूनच गरजू रुग्णांना मदत करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी भावना व्यक्त केली.
दरम्यान, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी जिल्हा कक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या कार्याचे कौतुक केले असून गरजू नागरिकांनी मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.



