spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पुण्यात धक्कादायक घटना, विषारी दारूमुळे 13 जणांचा बळी

– विषारी स्पिरिटयुक्त दारू शहरभरात विकल्याची माहिती

पुणे :- पुणे आणि पिंपरी चिंचवडमधे विषारु दारु प्यायल्याने आत्तापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर अनेकजण गंभीर आहेत. पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी भागात मिळून आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर पुण्यातील काळे पडळ भागात तीन आणि हडपसर भागात दोन अशा पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ही विषारी स्पिरिटयुक्त दारु योगेश वानखेडे याने बनवली होती. ती दारु पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या वेगवेगळ्या भागांमधे मिळून विकली गेली. दापोडी, फुगेवाडी, हडपसर , काळेपडळ भागातील ज्यांनी दारु प्यायली ते तोंडाला फेस येऊन मृत्युमुखी पडले. योगेश वानखेडे हा सराईत दारु विक्रेता असून या आधी अनेक गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत. त्याला पोलीसांनी अटक केली आहे.

दापोडी आणि फुगेवाडी परिसरात गुरुवारी एकाच दिवशी ८ नागरिकांचा मृत्यू

पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात गुरुवारी एकाच दिवशी ८ नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने संपूर्ण परिसरात घबराट आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, याच परिसरातील रहिवासी असलेल्या आणखी दोघांवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू असून, दोघांचीही प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. बंदी असलेली हातभट्टीची गावठी (विषारी) दारू प्यायल्यानेच या नागरिकांचा बळी गेल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या प्रकरणावरून आता राजकीय वातावरणही तापले असून, अशा अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त होत आहे.

गेल्या 48 तासांत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. फुगेवाडीतील आणखी तिघांचा मृत्यू झाला आहे.

अक्षय अवसरमल – वायसीएम रुग्णालयात मृत्यू

सौरभप्पा भंगारी – मेडीपाॅईट रुग्णालयात मृत्यू

भीमाप्पा बसवंत पुजारी – वायसीएम रुग्णालयात मृत्यू

अवैध हातभट्टीची दारू सर्रास विकली जात असल्याचा आरोप

परिसरात अवैध हातभट्टीची दारू सर्रास विकली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अशा घटनांकडे दुर्लक्ष करणारे पिंपरी-चिंचवड पोलीस कधी जागे होणार ? असा संतप्त सवाल उपस्थित करत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी महापौर योगेश बहल यांनी या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी लावून धरली आहे. स्थानिक आणि लोकप्रतिनिधींकडून विषारी दारूचा उघड आरोप केला जात असताना, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मात्र वेगळा दावा केला आहे.

मृत्यू वेगवेगळ्या कारणांनी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे

८ पैकी ५ नागरिकांचा मृत्यू वेगवेगळ्या कारणांनी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे मृत पावलेल्या ८ पैकी ५ व्यक्तींना मृत्यूपूर्वी तीव्र चक्कर आली होती, अशी माहिती खुद्द पोलिसांनीच दिली आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. उर्वरित मृत नागरिक आणि सध्या उपचार सुरू असलेल्या व्यक्तींची प्रकृती नेमकी दारू प्यायल्याने बिघडली होती का ? याचा तपास सध्या सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. एकाच दिवसात मृत पावलेले सर्व नागरिक एकाच परिसरातील रहिवासी आहेत. त्यामुळे त्यांचा मृत्यू विषारी दारू प्यायल्याने झाला, की पोलीस म्हणत असल्याप्रमाणे अन्य कोणत्या आजाराने किंवा कारणाने झाला ? हे अद्याप अधिकृत वैद्यकीय अहवालाअंती स्पष्ट झालेले नाही. या संभ्रमामुळे फुगेवाडी परिसरातील नागरिकांची चिंता कमालीची वाढली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.