– पेट्रोल-डिझेल दरवाढ, इंधन टंचाई, नीट पेपरफुटी व शेतकरी प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
हंसराज भंडारा :- देशात वाढत चाललेली महागाई, पेट्रोल-डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किमती, इंधन टंचाई, नीट पेपरफुटी प्रकरण तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाध्यक्ष मुकुंद विनोद साखरकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले.
माजी प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले व खासदार प्रशांत पडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी भंडारा शहरातील पेट्रोल पंपावर जाऊन नागरिकांना “मेलोडी” चॉकलेटचे वाटप केले. पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असताना केंद्र सरकार जनतेला केवळ आश्वासनांची “गोडी” दाखवत असल्याचा उपरोधिक संदेश यावेळी देण्यात आला. कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदविला.
यानंतर काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात पेट्रोल-डिझेल दरवाढ तात्काळ मागे घेऊन इंधनाचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.
यासोबतच शेतकरी हिताच्या दृष्टीने धानाला बोनस देण्यात यावा, धान खरेदीची मर्यादा (लिमिट) वाढविण्यात यावी, धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या धानाला योग्य व लाभदायक भाव मिळावा तसेच धान खरेदीचे उर्वरित चुकारे त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावेत, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
यावेळी पत्रकारांशी बोलताना जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकर म्हणाले की, “इंधन दरवाढ आणि इंधन टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे शेतीचा खर्च वाढला असून शेतकऱ्यांना शेती करणेही परवडेनासे झाले आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस, योग्य भाव आणि वेळेवर चुकारे मिळणे हा त्यांचा हक्क आहे. शासनाने तातडीने या प्रश्नांवर निर्णय घ्यावा, अन्यथा काँग्रेसच्या वतीने आणखी तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल.”
या आंदोलनात जिया पटेल, जय डोंगरे, विकास राऊत, प्यारेलाल वाघमारे, धनराज साठवणे, रिजवान काजी, नरेंद्र साकुरे, संजय बांते, अय्युब पटेल, मंगेश हुमणे, उमेश भुरे, विजय दुबे, यश चवळे, खुशाल साठवणे, गोपाल पंचभाई, पवन मस्के, निखिल तिजारे, संदेश श्यामकुवर,मोहित मोहरकर, कमल साठवणे, मनोहर उरकुडकर, कमल रायपूरकर, किशोर भोयर, राजेश पारधी, राकेश बिसने, रोहित खोब्रागडे, भाऊ कातोरे, इम्रान पटेल, दिलीप मडामे, रवी तिरपुडे, राजकपूर राऊत, सदानंद धारगावे, जनार्दन निंबार्ते, परमेश वलके, वैभव मेंढे, विनीत देशपांडे, शिवदास हटवार, नईम शेख, सुरेश गोनाडे, संजय कळंबे, सचिन फळे, संजय देवगडे, नितेश नरेश गजभिये, दिलीप कोतवाली, भावेश नागपुरे, विपीन बोरकर, श्रवण लांजेवार, गणेश बानेवार, गणेश लिमजे, अक्षत नांदरधने यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, युवक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



