– नगर पंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक असुरक्षित; स्वच्छतेचाही बोजवारा, उमेश मोहतुरे यांची आक्रमक मागणी
हंसराज, मोहाडी :- मोहाडी नगर पंचायतच्या अत्यंत बेजबाबदार आणि भोंगळ कारभारामुळे शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे केवळ वीज बिल न भरल्यामुळे बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, यामुळे मोहाडी शहर सध्या ‘रामभरोसे’ असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत आरोपींचा शोध घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले सीसीटीव्ही कॅमेरेच बंद असल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मोहाडी पोलीस स्टेशन परिसरातील कॅमेरे देखील बंद असल्याने, “कायदा आणि सुव्यवस्था राखणारी यंत्रणाच जर असुरक्षित असेल, तर सामान्य जनतेने कुणाकडे पाहायचे?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
साडेतीन लाखांची चोरी, पण कॅमेरे बंद! स्थानिक नागरिक उमेश मोहतुरे यांनी प्रशासनाच्या या कारभाराचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी सांगितले की, “मोहाडी परिसरात चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. माझ्या नातेवाईकाच्या दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्यांनी साडेतीन लाख रुपये लंपास केले. मात्र, परिसरातील शासकीय सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे पोलिसांना आता खासगी दुकानांमधील कॅमेऱ्यांचे फुटेज तपासावे लागत आहे. प्रशासनाने तात्काळ बिल भरून हे कॅमेरे सुरू करावेत, अन्यथा मोठे आंदोलन उभे केले जाईल.”
दुर्गंधीचे साम्राज्य केवळ सुरक्षाच नाही, तर नागरी सुविधांच्या बाबतीतही मोहाडी नगर पंचायत अपयशी ठरली आहे. गेल्या चार दिवसांपासून पोलीस स्टेशन परिसर आणि शहराच्या अनेक भागांत कचरा उचलणारी गाडी फिरकलीच नाही. परिणामी ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांकडून नियमित कर वसूल केला जातो, मात्र कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या बाबतीत प्रशासन पूर्णपणे सुस्त असल्याचे दिसून येत आहे.
मोहाडी शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ सुरू करावेत., केवळ मोहाडीच नव्हे, तर संपूर्ण भंडारा जिल्ह्यातील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी., शहरातील कचरा उचलण्याची व्यवस्था नियमित करून स्वच्छता राखली जावी., कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी.
“सीसीटीव्ही बंद, स्वच्छता बंद… मग प्रशासन नेमकं सुरू तरी काय आहे?” असा सवाल आता सामान्य जनता विचारत आहे. या गंभीर प्रकरणाची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी मागणी उमेश मोहतुरे आणि मोहाडीतील त्रस्त नागरिकांनी केली आहे.



