– पत्रकार यांच्या दुचाकीवर बसून जाणून घेतल्या समस्या; खासदारांची संवेदनशीलता पाहून गावकरी भारावले
हंसराज भंडारा,बेला :- राजकारणात नेते निवडून आल्यावर जनसंपर्क विसरतात, असा सार्वत्रिक अनुभव असताना, भंडारा-गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी मात्र आपल्या कृतीतून एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे. ४५ अंश सेल्सिअस तापमानात आपली आरामदायी एसी गाडी सोडून, एका पत्रकारासोबत थेट गावात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेणाऱ्या खासदाराची सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे.
‘इन्सायडर न्यूज टुडे’चे (Insider News Today) पत्रकार हंसराज हे भंडारा जवळ असलेला बेला गावातील काही स्थानिक समस्यांचे वार्तांकन करण्यासाठी आपल्या दुचाकीने गावाकडे जात होते. दरम्यान, मागून येणाऱ्या खासदार प्रशांत पडोळे यांच्या ताफ्याने पत्रकार यांना पाहिले. खासदारांनी तात्काळ आपली गाडी थांबवून पत्रकार यांची विचारपूस केली. “कुठे निघालात?” अशी विचारणा केली असता, पत्रकार यांनी गावात सुरू असलेल्या गंभीर समस्यांची आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराची माहिती दिली.

एसी गाडी सोडली अन् दुचाकीवर बसले! गावची समस्या ऐकताच खासदार पडोळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता “मी सुद्धा तुमच्यासोबत येतो,” असे सांगितले. बाहेर सूर्य आग ओकत होता, तापमान ४५ अंशांच्या पार होते. मोठे अधिकारी साध्या एअरकंडिशन गाडीतून खाली उतरायला तयार नसताना, चक्क खासदारांनी आपली लक्झरी गाडी सोडून पत्रकारासोबत जाणे पसंत केले. इतकेच नव्हे तर, गावकऱ्यांच्या सुविधेसाठी ते चक्क दुचाकीवर बसून गावात पोहोचले, हे पाहून गावकरी सुद्धा थक्क झाले.
घटनास्थळावरूनच अधिकाऱ्यांना पाचारण
गावात पोहोचताच खासदार पडोळे यांनी नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या. नुसते आश्वासन न देता, त्यांनी रणरणत्या उन्हात उभे राहून संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावला आणि तातडीने प्रश्न सोडवण्याचे आदेश दिले. त्यांच्या या तत्परतेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जनतेची पहिली पसंती!
“आतापर्यंत आम्ही अनेक नेते आणि अधिकारी पाहिले, पण असा जमिनीवरचा माणूस पाहिला नाही,” अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.
रस्त्याने जाता जाता पत्रकाराच्या एका माहितीवर विश्वास ठेवून थेट लोकांच्या प्रश्नांसाठी धावून येणारा लोकप्रतिनिधी पाहून “जनतेचा खासदार असावा तर असा,” अशी चर्चा आता रंगू लागली आहे. जनतेच्या सुख-दुखात धावून येणारा नेता म्हणून खासदार प्रशांत पडोळे आज नागरिकांची पहिली पसंती ठरत असल्याचे या घटनेवरून अधोरेखित झाले आहे.



