– जनहिताच्या मुद्द्यांवर स्वतंत्रपणे काम करण्याचा कळंबे यांचा निर्धार
नागपूर :- आम आदमी पार्टीचे नागपूर शहराध्यक्ष अजिंक्य मारोती कळंबे यांनी आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक आणि सामाजिक कारणांमुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, आगामी काळात नागरिकांच्या विविध प्रश्नांवर स्वतंत्रपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. अजिंक्य कळंबे हे नागपूर शहरातील विविध सामाजिक, नागरी व जनहिताच्या विषयांवर सातत्याने भूमिका मांडत आले आहेत. आम आदमी पार्टीच्या माध्यमातून त्यांनी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, युवकांचे रोजगार, सार्वजनिक सुविधा, प्रशासनातील पारदर्शकता आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी आवाज उठविला होता. मात्र आता त्यांनी पक्षीय राजकारणातून बाजूला होत समाज हिताच्या प्रश्नांवर स्वतंत्रपणे कार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. राजीनाम्या नंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कळंबे म्हणाले की, “जनसेवा ही कोणत्याही पदापुरती किंवा पक्षापुरती मर्यादित नसते. नागरिकांच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि संधींसाठी काम करण्याची माझी बांधिलकी कायम राहील. पदाचा राजीनामा दिला असला तरी समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि जनहितासाठीचा संघर्ष यापुढेही सुरू राहील.”पक्षातील आपल्या कार्यकाळाचा आढावा घेताना त्यांनी पक्ष नेतृत्व, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांचे मनःपूर्वक आभार मानले. पक्षात काम करताना जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याची संधी मिळाली तसेच संघटनात्मक कार्य, लोकसंपर्क आणि सामाजिक प्रश्नांची जाण विकसित झाल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रवासात साथ देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कळंबे यांनी पुढे सांगितले की, नागपूर शहरातील विविध नागरी समस्या, प्रशासनातील उत्तरदायित्व, युवकांचे प्रश्न, रोजगारनिर्मिती, सार्वजनिक सुविधा आणि नागरिकांच्या अधिकारांसाठी ते स्वतंत्रपणे कार्यरत राहतील. जनतेच्या अपेक्षा आणि विश्वास यांना न्याय देण्यासाठी अधिक व्यापक स्वरूपात सामाजिक व लोकहिताची चळवळ उभी करण्याचा त्यांचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “जे शिकलो आणि जे मिळालं त्याबद्दल मी सदैव कृतज्ञ आहे. आता पुढील प्रवास जनतेसोबत आणि जनतेसाठी असेल,” असे सांगत त्यांनी आपल्या पुढील सामाजिक वाटचालीचे संकेत दिले. शेवटी त्यांनी आम आदमी पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे, समर्थकांचे तसेच नागपूरकर नागरिकांचे आभार मानत त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यांच्या राजीनाम्यामुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून, आगामी काळात त्यांच्या स्वतंत्र सामाजिक व जनआंदोलनात्मक भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







