हंसराज,भंडारा गणेशपूर :- भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण असलेल्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून, दिनांक ६ जून २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता गणेशपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाराजांच्या सिंहासनाधीश पुतळ्याचा जलाभिषेक करून विधिवत पूजन करण्यात आले.
६ जून १६७४ रोजी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. हा दिवस केवळ एका राजाचा राज्यारोहण सोहळा नसून, परकीय आक्रमकांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेल्या ‘हिंदवी स्वराज्याची’ अधिकृत घोषणा होती. याच ऐतिहासिक घटनेचे स्मरण करत गणेशपूरमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजन्मोत्सव समिती व ग्रामस्थांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्याला जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे, ग्रामपंचायत सदस्य शेखर खराबे, विजय बडवाईक, महेश भोंगाळे, मयूर गबने यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित युवकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील मोठ्या संख्येने युवक आणि शिवप्रेमी नागरिकांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी शिवरायांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले.







