spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

संगीत नाटक अकादमीचे प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर

– अशोक पत्की, आनंद भाटे, अरुण नलावडे यांच्यासह महाराष्ट्रातील दिग्गज व युवा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव

नवी दिल्ली :- भारतीय संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककलांच्या जतन व संवर्धनासाठी देशातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ‘संगीत नाटक अकादमी’च्या वतीने वर्ष 2024 आणि 2025 साठीचे प्रतिष्ठित ‘संगीत नाटक अकादमी फेलोशिप’, ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ तसेच ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ, दिग्गज तसेच युवा कलावंतांनी राष्ट्रीय स्तरावर मानाचा सन्मान मिळवत राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा गौरव वाढविला आहे.

यंदाच्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील संगीत, नाट्य, नृत्य, लोककला आणि पारंपरिक कला क्षेत्रातील अनेक मान्यवर कलावंतांचा गौरव करण्यात आला आहे. ज्येष्ठ कलावंतांसोबतच युवा कलाकारांनाही राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळाल्याने महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला नवी ओळख मिळाली आहे.

वर्ष 2024 मधील महाराष्ट्राचे पुरस्कार मानकरी

वर्ष 2024 साठी जाहीर करण्यात आलेल्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांमध्ये हिंदुस्तानी शास्त्रीय गायन क्षेत्रातील ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर आणि अभंग गायनासाठी प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांचा समावेश आहे. अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी अभिनेते अरुण नलावडे, पारंपरिक रंगभूमी क्षेत्रासाठी मुकुंद मराठे, लोकनृत्य क्षेत्रासाठी सुभाष नारायण नकाशे तसेच नृत्य क्षेत्रातील संशोधन आणि अभ्यासपूर्ण योगदानासाठी शुभदा वरदकर यांची निवड करण्यात आली आहे.‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कारां’मध्ये हिंदुस्तानी गायनासाठी कृष्ण बोंगाणे आणि अंकिता जोशी, भारूड या लोकसंगीत प्रकारासाठी भावार्थ रामचंद्र देखणे, बाहुलीनाट्य या दुर्मिळ लोककलेसाठी बाळकृष्ण गणपत मसगे आणि लोकनृत्य व लोकसंगीतासाठी चेतन वामन खेडेकर यांची निवड झाली आहे.

वर्ष 2025 मधील महाराष्ट्राचे पुरस्कार मानकरी

वर्ष 2025साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांमध्ये शहनाई वादनासाठी शैलेश भागवत, दिग्दर्शन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी प्रमोद डी. पवार, नाट्यसंगीत क्षेत्रातील दीर्घकालीन योगदानासाठी ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की तसेच कथक नृत्य क्षेत्रातील विशेष कार्यासाठी मनीषा साठे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कारां’मध्ये हार्मोनियम वादनातील प्रभुत्वासाठी तन्मय देवचके आणि महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतील जागर या लोकसंगीत प्रकारासाठी प्रवीण प्रताप जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

या पुरस्कारांचे स्वरूप अत्यंत प्रतिष्ठेचे असून, अकादमी पुरस्काराचे स्वरूप 1,00,000 रुपये, ताम्रपट आणि शाल असे आहे, तर युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कारांतर्गत 25,000 रुपये, ताम्रपट आणि शाल देऊन सन्मानित केले जाते. हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या उपस्थितीत आयोजित विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार असल्याचे अकादमीतर्फे कळविण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.