– वारंवार भरकटणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला आस्था पुनर्वसन निवारा गृहाच्या पुढाकारातून पुन्हा मिळाला कुटुंबाचा आधार
विसराळूपणा आणि मानसिक स्थितीतील अडचणींमुळे वारंवार भरकटणाऱ्या ७७ वर्षीय बाबुराम यांना अखेर त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्यात यश आले. नागपूर महानगरपालिकेच्या केंद्र शासन पुरस्कृत समाज विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या भिक्षेकरी पुनर्वसन प्रकल्पातील सह्याद्री फाउंडेशन संचलित आस्था पुनर्वसन निवारा गृहाच्या पुढाकारातून १५ ऑक्टोबर २०२६ रोजी पंजाब राज्यातील त्यांच्या मूळ गावी परिवार मिलन घडवून आणण्यात आले.
बाबुराम हे पाचपावली पोलीस ठाण्याच्या माध्यमातून आस्था पुनर्वसन निवारा गृहात दाखल झाले होते. निवारा गृहात दाखल झाले, तेव्हा त्यांची मानसिक स्थिती अस्थिर होती. सुरुवातीच्या काळात ते वारंवार आरडाओरडा करीत असत. विसराळूपणामुळे ते निवारा गृहाच्या परिसरात भटकत असत. तसेच, इतरांशी वाद होण्याचे प्रसंगही घडत होते. त्यामुळे त्यांची योग्य देखभाल, समुपदेशन आणि सुरक्षितता यांना प्राधान्य देण्यात आले.
यापूर्वीही बाबुराम विसराळूपणामुळे राजस्थान आणि पंजाब परिसरात भरकटले होते. त्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांनी शोध घेऊन त्यांना पुन्हा घरी आणले होते. मात्र, त्यानंतरही ते पुन्हा भरकटले आणि चार राज्यांचा प्रवास करीत नागपूरपर्यंत पोहोचले. त्यामुळे त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे होते.
पोलिसांच्या सहकार्याने कुटुंबाचा शोध-
आस्था निवारा गृहात दाखल झाल्यानंतर बाबुराम यांच्या आरोग्याची, दैनंदिन गरजांची आणि मानसिक स्थितीची काळजी घेण्यात आली. त्यांचे समुपदेशन करण्यात आले, तसेच कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. आस्था निवारा गृहाचे व्यवस्थापक वैभव बागडे यांनी बाबुराम यांची परिस्थिती लक्षात घेऊन अजनी पोलीस ठाण्याच्या मिसिंग विभागातील रुखसार शेख यांच्याशी संपर्क साधला आणि आवश्यक माहिती दिली. त्यानंतर संबंधित पोलीस यंत्रणेच्या सहकार्याने पंजाबमधील त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यात आला.
काही दिवसांच्या प्रयत्नांनंतर कुटुंबीयांशी संपर्क प्रस्थापित झाला. बाबुराम नागपूर येथील आस्था पुनर्वसन निवारा गृहात सुरक्षित असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. आवश्यक माहितीची पडताळणी केल्यानंतर परिवार मिलनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
चार राज्यांचा प्रवास करून कुटुंबीयांशी पुनर्भेट-
कुटुंबीयांचा शोध लागल्यानंतर बाबुराम यांना त्यांच्या मूळ गावी पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले. आस्था निवारा गृहाचे सामाजिक कार्यकर्ते तुषार रामचंद्रजी हुकरे यांनी रेल्वेने प्रत्यक्ष प्रवास करून बाबुराम यांना पंजाबमधील त्यांच्या मूळ गावी नेले आणि कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. यावेळी कुटुंबीयांचेही समुपदेशन करण्यात आले.
कुटुंबीयांचा शोध घेण्यापासून ते प्रत्यक्ष घरी पोहोचविण्यापर्यंत संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात आली. चार राज्यांचा प्रवास करून घडवून आणलेल्या या परिवार मिलनातून पुनर्वसन कार्यातील सातत्य, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली.
नात्याला मिळाला आधार-
रस्त्यावर भरकटलेल्या आणि कुटुंबापासून दूर गेलेल्या व्यक्तींना सुरक्षित निवारा, आवश्यक देखभाल, समुपदेशन आणि कुटुंबीयांशी पुनर्भेट मिळवून देणे हे आस्था पुनर्वसन निवारा गृहाच्या कार्याचे महत्त्वाचे अंग आहे. बाबुराम यांचे परिवार मिलन हे या कार्याचे आणखी एक उदाहरण ठरले. त्यांना प्रत्यक्ष त्यांच्या मूळ गावी पोहोचवून कुटुंबीयांच्या स्वाधीन केल्याने पुन्हा कुटुंबाचा आधार मिळवून देण्याचा प्रयत्न यशस्वी झाला.
या परिवार मिलनासाठी सह्याद्री फाउंडेशनचे संचालक देवेंद्र श्रीसागर यांचे मार्गदर्शन लाभले. आस्था निवारा गृहाचे अधीक्षक गौतम नागरे, सामाजिक कार्यकर्ते तुषार रामचंद्र हुकरे, व्यवस्थापक वैभव बागडे, काळजीवाहक कार्तिक कोडवते व अनंता नागोसे, डॉ. अमिषा केसरे, समुपदेशक संजना मडकाम, परिचारिका योगिता भूमकर तसेच इतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. अजनी पोलीस ठाण्याच्या मिसिंग विभागासह संबंधित पोलीस यंत्रणेचेही महत्त्वपूर्ण सहकार्य मिळाले.








