– विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारातून संस्कृती संवर्धन आणि सामाजिक एकतेचा संदेश
नागपूर :- सत्यमेव जयते शिक्षण प्रसारक मंडळ, नागपूरद्वारा संचालित एकात्मता उच्च प्राथमिक विद्यालय, एकात्मता नगर, जयताळा, नागपूर येथे १७ ऑक्टोबर रोजी आनंदी शनिवार उपक्रमांतर्गत गरबा महोत्सवाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक पारंपरिक वेशभूषा परिधान करून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. गरब्याच्या तालावर विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्यकलेचे सुंदर सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे संपूर्ण शालेय परिसर आनंदमय आणि सांस्कृतिक रंगांनी न्हाऊन निघाला. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच संस्कृतीची ओळख करून देणे, पारंपरिक कला व लोकपरंपरांचे जतन करणे आणि सामाजिक एकतेची भावना रुजविणे हे शालेय शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य, शिस्त, संघभावना आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होते. एकत्रितपणे काम करण्याचे कौशल्य विकसित होऊन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासालाही चालना मिळते. याच उद्देशाने विद्यालयात गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला एकात्मता परिसरातील उद्योजक मिथुन नागदेवते यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद उरकुडे, सहाय्यक शिक्षिका शुभांगी कातुरे, सुनीता गावंडे, धनश्री ढेगेकर यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि सर्वांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम आनंददायी, उत्साहपूर्ण व संस्मरणीय वातावरणात संपन्न झाला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीविषयी आदर निर्माण होऊन एकता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याची मूल्ये दृढ होतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रमांसोबतच सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांनाही विद्यालयाकडून प्राधान्य दिले जात असल्याचे या कार्यक्रमातून दिसून आले.








