– कामठी आणि नागपुरात काँग्रेस, माविआच्या आढावा बैठका
कामठी/नागपूर :- मागील सहा वर्षांत रोजगारनिर्मिती, शिक्षण क्षेत्राचे बळकटीकरण आणि डिजिटायझेशन या क्षेत्रांत भरीव कार्य केले आहे. या कामाला अधिक गती देऊन पदवीधर व शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे सोडविण्यासाठी पुन्हा एकदा नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून संधी द्यावी, असे आवाहन महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजित गोविंदराव वंजारी यांनी केले.
नागपूर येथील श्रीनगर, नंदनवन तसेच कामठी येथे आयोजित आढावा बैठकांमध्ये ते बोलत होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट), विमाशि तसेच विविध शिक्षक व कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आगामी निवडणूक प्रचाराचा आढावा घेण्यात आला.

कामठी येथील कुसुमताई संगेवार सभागृह, कळमना रोड येथे झालेल्या बैठकीस माजी मंत्री सुनील केदार, रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री राजेंद्र मुळक, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अश्विन बैस, माजी उपसभापती अवंतिका लेकुरवाळे, नागपूर जिल्हा निरीक्षक रविंद्र दरेकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव शकूरभाई नागानी, माजी जिल्हा परिषद सदस्य सरिता रंगारी, शिवसेना (उबाठा) उपाध्यक्ष राधेश्याम हटवार, नगरसेवक साजिद आणि महेश गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
नंदनवन येथील श्रीनगर परिसरात झालेल्या बैठकीस सामाजिक कार्यकर्ते राकेश कनोजे, विजु वनवे, अमोल आखरे, आखरे काकाजी, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे भूषण तल्हार तसेच माजी नगरसेविका नयना झाडे उपस्थित होत्या.
दोन्ही बैठकांमध्ये पदवीधर व शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर, शिक्षण क्षेत्रातील आव्हानांवर, संघटनात्मक बांधणीवर आणि आगामी निवडणुकीच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रचार यंत्रणा अधिक सक्षम करणे, विविध संघटनांमध्ये समन्वय साधणे आणि मतदारांपर्यंत विकासकामांची माहिती पोहोचविणे यावरही भर देण्यात आला.
गेल्या सहा वर्षांत केलेल्या कामाच्या बळावर आगामी काळातही रोजगार, शिक्षण आणि तंत्रज्ञानाधारित सुविधांच्या विस्तारासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार अभिजित वंजारी यांनी व्यक्त केला. पदवीधरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांना विधिमंडळात प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी पुन्हा संधी देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.








