spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राजुरा येथे दुर्दैवी घटना : रेल्वेच्या धडकेत तीन महिन्यांच्या बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू

राजुरा :- राजुरा वनपरिक्षेत्रातील नलफडी अंतर्गत कक्ष क्रमांक १७९ मध्ये बल्लारशाह–काजीपेठ रेल्वे मार्गावरील डाउन लाईनवर तीन महिन्यांच्या मादी बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळून आल्याने वन विभागासह वन्यजीवप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना ९ जून रोजी रात्री सुमारे ८.१५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

रेल्वे रुळांजवळ बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत दिसताच वन विभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

प्राथमिक तपास आणि शवविच्छेदन अहवालानुसार, हे पिल्लू भरधाव रेल्वेगाडीच्या धडकेत गंभीर जखमी झाले होते. धडक इतकी तीव्र होती की, त्याला गंभीर दुखापत झाली आणि अपघातामुळे झालेल्या न्यूरोलॉजिकल शॉकमुळे त्याचा मृत्यू झाला. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार मृत मादी बिबट्याचे वय अंदाजे तीन महिने होते. या घटनेनंतर पुन्हा एकदा वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक वन्यजीवप्रेमी आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी बल्लारशाह–काजीपेठ रेल्वेमार्ग हा वनक्षेत्रातून जात असल्याने या परिसरात वन्यप्राण्यांची सतत वर्दळ असते, असे सांगितले. मात्र, पुरेशा सुरक्षा उपाययोजनांचा अभाव असल्याने वन्यजीव वारंवार रेल्वे अपघातांचे बळी ठरत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, या मार्गावर यापूर्वीही अनेक वन्यप्राण्यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि वन विभागाने संयुक्तपणे प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज आहे. संवेदनशील वनक्षेत्रांमध्ये रेल्वेगाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे, इशारा फलक उभारणे तसेच वन्यजीवांच्या नैसर्गिक मार्गांची ओळख करून विशेष सुरक्षा व्यवस्था निर्माण करणे आवश्यक असल्याची मागणी तज्ज्ञांनी केली आहे. दरम्यान, राजुरा येथील लघु पशुसर्व चिकित्सालयाचे सहायक आयुक्त डॉ. एन. पी. तेलंगे यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर वन विभागाच्या नियमांनुसार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेहाचे अंतिम निस्तारण करण्यात आले.

या दुर्दैवी घटनेमुळे विकासकामे आणि वन्यजीव संवर्धन यांच्यात समतोल साधण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली असून, दुर्मिळ वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.