संदीप कांबळे, कामठी :- शहरातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी स्वच्छ भारत संचालनालयामार्फत कामठी नगर परिषदेला अत्याधुनिक सक्शन कम जेटिंग मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वाहनाचे लोकार्पण मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
कामठी नगर परिषदेला हे मशीन मिळावे यासाठी मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी स्वच्छ भारत संचालनालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. आर्यन पम्प्स अँड एन्व्हायरो सोल्युशन्स प्रा. लि. निर्मित हे अत्याधुनिक मशीन गटारे, नाले आणि भूमिगत ड्रेनेज लाईनची सफाई करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या मशीनमध्ये ८ हजार लिटर क्षमतेची दुहेरी टाकी असून, एका भागात सांडपाणी व गाळ सक्शनद्वारे उचलण्याची, तर दुसऱ्या भागातून उच्च दाबाने पाण्याचा मारा करून ड्रेनेज लाईन स्वच्छ करण्याची सुविधा आहे.
या मशीनमुळे शहरातील सांडपाणी व्यवस्थापन, गटार सफाई आणि ड्रेनेज देखभाल अधिक वेगाने व प्रभावीपणे करता येणार आहे. तसेच नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध होण्यास मदत होणार असून, पावसाळ्यात गटारे तुंबण्याच्या समस्यांवरही मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येणार आहे.
नागरिकांच्या आरोग्य व सुविधांना प्राधान्य – मुख्याधिकारी विनोद जाधव
“सक्शन कम जेटिंग मशीन कामठी नगर परिषदेला मिळावे यासाठी स्वच्छ भारत संचालनालयाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. शहराच्या स्वच्छतेसाठी आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करणे ही काळाची गरज आहे. नागरिकांच्या आरोग्य व सुविधांना प्राधान्य देण्याच्या भूमिकेतून या नव्या वाहनाच्या समावेशामुळे स्वच्छता मोहिमेला अधिक गती मिळणार आहे,” असे प्रतिपादन मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी केले.








