ओएनजीसी उरण प्लांटबाहेर तेल गळतीचे वृत्त खोटे

0
20

– कंपनीकडून सविस्तर स्पष्टीकरण आणि चौकशीचे आदेश

नवी मुंबई :- ओईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) च्या उरण येथील प्लांटबाहेर तेल गळती झाल्याच्या चर्चांना कंपनी प्रशासनाने पूर्णविराम दिला आहे. दि. १७ जून २०२६ रोजी ओएनजीसी उरण प्लांटबाहेर तेल गळती झाल्याच्या काही बातम्या आणि अफवा पसरल्या होत्या, मात्र या सर्व बातम्या पूर्णपणे चुकीच्या आणि निराधार असल्याचे स्पष्टीकरण ओएनजीसीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीची माहिती देताना ओएनजीसीने सांगितले की, आज सकाळी साधारण १०:५० वाजताच्या सुमारास उरण प्लांटसमोरील रस्त्याच्या पलीकडे असलेल्या एका पावसाळी पाण्याच्या नाल्यातून (स्टॉर्म वॉटर चॅनल) उग्र आणि आम्लयुक्त वायूचे/धुराचे लोट निघत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या माहितीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ओएनजीसीच्या आपत्कालीन पथकाने (इमर्जन्सी टीम) तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

या पथकाने केलेल्या प्राथमिक तपासणीत ओएनजीसीच्या कोणत्याही पाईपलाईनमधून कोणत्याही प्रकारची गळती झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच या संपूर्ण प्रकारामुळे प्लांटच्या दैनंदिन कामकाजावर कोणताही परिणाम झालेला नाही आणि कामकाज नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू आहे. असे असले तरी, सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, या नाल्यातून अचानक उग्र धूर किंवा वायू का निघत होता, याच्या मूळ कारणाचा शोध घेण्यासाठी ओएनजीसीने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. ओएनजीसी मुंबईच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स विभागाने नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.