Home Latest News कामठी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेचे जाळे; भोंदूबाबांच्या दुकानदारीला टाळे कोण लावणार?

कामठी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेचे जाळे; भोंदूबाबांच्या दुकानदारीला टाळे कोण लावणार?

0
27

संदीप कांबळे, कामठी :- कामठी शहर व तालुक्यात अंधश्रद्धेचे जाळे दिवसेंदिवस वाढत असून भोंदूबाबांच्या बुवाबाजीला पुन्हा एकदा उधाण आले आहे. यामुळे अनेक नागरिक फसवणूक, आर्थिक लूट आणि मानसिक शोषणाचे बळी ठरत असल्याने जागरूक नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

कामठी शहरात गोरगरीब, दलित, बिडी मजूर, विणकर तसेच विविध धर्मीय आणि जातीजमातींचे नागरिक वास्तव्यास आहेत. शहरासह ग्रामीण भागात मांजर आडवे जाणे, भूतबाधा, करणी, अंगारे-धुपारे, गंडेदोरे, पायाळू व्यक्तीला गुप्तधन दिसते, साप चावल्यानंतर वैद्यकीय उपचाराऐवजी मंत्रिकांकडे जाणे यांसारख्या अंधश्रद्धांवर अनेकजण आजही विश्वास ठेवत असल्याचे दिसून येत आहे.

कामठी शहरातील अनेक झोपडपट्ट्या व काही भागांमध्ये भोंदूबाबांनी आपली दुकानदारी थाटली असून भूतप्रेत उतरविणे, घरातील संकट दूर करणे, मूलबाळ होण्यासाठी उपाय सांगणे, रक्कम दुप्पट करून देणे, सट्ट्याचे नंबर काढणे, गुप्तधन शोधून देणे, मुलींना वश करणे यांसारख्या आमिषांद्वारे नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप होत आहे.

काही वर्षांपूर्वी रक्कम दुप्पट करण्याच्या आमिषाने कामठीतील एका दाम्पत्याची हत्या झाल्याची आणि एका महिलेच्या बेपत्ता होण्याची घटना घडली होती. या घटनांमुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने भोंदूबाबांना चमत्कार सिद्ध करण्याचे खुले आव्हान देत जनजागृती केली होती. त्या काळात अनेक भोंदूबाबांचे बिंग फुटले आणि त्यांची दुकानदारी काही प्रमाणात बंद पडली होती.

मात्र, सध्या पुन्हा एकदा शहर आणि ग्रामीण भागात ढोंगी बाबांचे प्रस्थ वाढताना दिसत असून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी व्यापक जनजागृती, कायदेशीर कारवाई आणि प्रशासनाच्या प्रभावी हस्तक्षेपाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे, “कामठीतील भोंदूबाबांच्या दुकानदारीला टाळे कोण लावणार?” असा सवाल जागरूक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.