spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शिक्षक पात्रता परीक्षेसाठी परीक्षा परिषद सज्ज

२८ जून रोजी १७२९ केंद्रांवर होणार परीक्षा

नागपूर :- महाराष्ट्र् राज्य शिक्षक परिषदेतर्फे येत्या २८ जून २०२६ रोजी महाराष्ट्र् शिक्षक पात्रता परीक्षा २०२६ घेण्यात येणार असून, त्यासाठी राज्यभरातील ३७ जिल्हास्तरावर जिल्हा मुख्यालयी एकूण १७२९ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, परीक्षार्थीना परीक्षा केंद्रात मोबाईल, स्मार्ट वॉच, कॅल्क्युलेटर यासारखे इलेक्ट्रॉनिक साहित्य नेता येणार नाही. तसेच प्रत्येक परीक्षार्थीची मेटल डिटेक्टर चाचणी करण्यात येणार आहे. त्यांचे बायोमेट्रिक, फेस रिकग्नेशन करण्यात येईल. आवेदनपत्राच्या मूळ डाटाबेसशी साधर्म्य असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच केंद्रात प्रवेश दिला जाईल. काहीवेळा मूळ डाटा बेससशी विद्यार्थ्यांच्या फेस रिकग्नेशनची माहिती न जुळल्यास केंद्र संचालक प्रत्यक्ष व्यक्ती, त्यांचे ओळखपत्र, प्रवेशपत्रावरील फोटो यांची खातरजमा करून ओळख पटल्यावर परीक्षार्थीला प्रवेश देऊ शकतील. तसेच संशयित उमेदवाराची आधार पडताळणी परीक्षा कालावधीतच करण्यात येईल. मूळ उमेदवाराऐवजी अन्य कोणी प्रवेश करीत असल्यास तात्काळ फौजदारी कारवाई करण्यात येईल.

परीक्षा केंद्रावर आधार आणि बायोमेट्रिक व फ्रीस्किंग होणार असल्याने परीक्षार्थीनी पेपर १ साठी सकाळी ८.३० वाजता व पेपर २ साठी दुपारी १२.३० वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहायचे आहे. सकाळच्या पेपरला सकाळी १०.१० नंतर व दुपारच्या पेपरला दुपारी २.१० नंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षा दालन, परीक्षा केंद्राचे प्रवेशद्वार व केंद्र संचालकांच्या कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यांचा लाइव्ह ॲक्सेस जिल्हा संनियंत्रण कक्ष- शिक्षणाधिकारी कार्यालय व परीक्षा परिषदेत घेतला जणार आहे.

परीक्षेतील पारदर्शकता व विश्वासार्हता कायम राखण्यासाठी परीक्षा केंद्र संचालक, संनियंत्रण कक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कक्ष यांच्याकडे इंटरनेट फोन उपलब्ध असणार आहेत. केंद्र व राज्य शासनाच्यावतीने मागील वर्षी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेमधील उमेदवाराचे फोटो व नावे या परीक्षेतील उमेदवारांशी पडातळणी करण्यात येणार आहे. एक उमेदवार आणि फोटो वेगळे किंवा एकच फोटो व नावे वेगवेगळी आढळल्यास अशा उमेदवारांची यादी परीक्षेपूर्वीच पडताळणीसाठी उपलब्ध होईल. त्यामुळे परीक्षेपूर्वीच बोगस उमेदवारांची ओळख पटवली जाणार आहे.

परीक्षेला जाताना उमेदवारांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, मतदान कार्ड यापैकी एक फोटो ओळखपत्राची मूळ व सत्यप्रत सोबत ठेवावी, परीक्षा केंद्रात दुपट्टा, बुरखा, मास्क, टोपी वापरता येणार नाही. गैरप्रकारांना आळ घालण्यासाठी उत्तर पत्रिकेसबोत दोन कार्बनकॉपी राहतील. यातील एक उमेदवारासाठी, तर दुसरी परीक्षा परिषदेची असेल.

यावेळी प्रथमच प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक पानावर विशिष्ट क्रमांक तसेच क्यू आर कोड असणार आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराची प्रश्नपत्रिका कोणतयाही टप्प्यावर ओळखता येईल. प्रत्यक्षात किती प्रश्न सोडविले याची संख्या उत्तर पत्रिकेत नमूद करणे अनिवार्य आहे.

ज्या दिव्यांग परीक्षार्थीना लेखनिक घ्यायचा असेल त्यांना शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडून पूर्व परवानगी घ्यावी लागेल. त्यासाठी लेखनिकासह शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद येथे भेट द्यावी लागेल. लेखनिक बारावीपेक्षा जास्त शिकलेला नसावा तसेच त्याचे वय २८-६-२०२६ रोजी १९ वर्षांपेक्षा कमी असावे. तसेच तो उमेदवाराच्या कुटुंबातील सदस्य नसावा. प्रवेशपत्र उमेदवाराच्या लॉगिनमध्ये ऑनलाइन पद्धतीने १६ जून २०२६ पासून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ते डाऊनलोड करून घ्यावे तसेच वेळेवरची धावपळ टाळण्यासाठी परीक्षा केंद्राचा पत्ता अगोदरच माहिती करून घ्यावा, असे महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी कळविले आहे.

Popular Articles