ज्ञानयोगी, विदर्भ सिंचन अनुशेष निर्मूलनाचे महर्षी, गाढे अभ्यासक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार प्रा. बी. टी. उर्फ भाऊराव तुळशीराम देशमुख यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या आणि विशेषतः विदर्भाच्या शैक्षणिक, सामाजिक तसेच विधिमंडळ इतिहासातील एक झुंजार, अभ्यासू आणि निष्ठावंत नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. प्रा. बी. टी. देशमुख यांनी आयुष्यभर प्राध्यापक, शिक्षक आणि पदवीधरांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. शिक्षण क्षेत्राला दिशा देण्यासोबतच त्यांनी विदर्भाच्या सिंचन आणि आर्थिक अनुशेषाचा प्रश्न सभागृहात अत्यंत आक्रमकपणे व पुराव्यांसह मांडला. प्रा. बी. टी. यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला होता. त्यांनी अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयातून आपले उच्च शिक्षण (राज्यशास्त्र विषयात एम.ए.) पूर्ण केले. शिक्षणाची प्रचंड आवड आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीमुळे त्यांनी प्राध्यापक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांचा सार्वजनिक प्रवास अमरावतीच्या ‘दैनिक हिंदुस्थान’ या वृत्तपत्रातून एक निर्भीड पत्रकार म्हणून सुरू झाला. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न मांडता मांडता ते पुढे प्राध्यापक झाले आणि नंतर विदर्भातील शिक्षकांचे सर्वात खंबीर नेतृत्व म्हणून उदयाला आले. प्रा. बी. टी. यांनी संसदीय आणि संघटनात्मक पातळीवर अनेक महत्त्वाची पदे भूषवली व आपल्या कार्याचा ठसा उमटवला. ते १९८० ते २००९ या प्रदीर्घ काळात अमरावती पदवीधर मतदारसंघातून सलग ६ वेळा विधान परिषदेवर निवडून गेले होते. एकाच पदवीधर मतदारसंघातून सलग तीन दशके जनमानसाचा विश्वास संपादन करणे हा एक ऐतिहासिक विक्रम म्हणावा लागेल. ते ‘नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन’ (नुटा) या अत्यंत प्रभावी शिक्षक संघटनेचे संस्थापक आणि प्रदीर्घकाळ अध्यक्ष राहिले.
शिक्षकांपर्यंत शासकीय धोरणे आणि न्यायालयीन निकाल पोहोचवण्यासाठी त्यांनी १५ ऑगस्ट १९७७ रोजी ‘नुटा बुलेटिन’ सुरू केले. गेली ५० वर्षे ते या द्विसाप्ताहिकाच्या माध्यमातून वैचारिक आणि शैक्षणिक जागृती करत राहिले. पदवीधरांचे आणि जनतेचे प्रश्न सुटत नाहीत, हे पाहून त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याचे ऐतिहासिक आणि नैतिक धैर्य दाखवले होते. शिक्षण क्षेत्रातील प्रा. बी.टी. यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांनी केवळ शिक्षकांचे पगार किंवा सेवाशर्तींसाठी लढा दिला नाही, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या गुणवत्तेसाठी काम केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या स्थापनेमध्ये प्रा. देशमुखांचा सिंहाचा वाटा होता. विद्यापीठ स्थापनेसाठी त्यांनी विधिमंडळात मोठा संघर्ष केला होता. विधान परिषदेत तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना आणि अर्ध्या तासाच्या चर्चेसारख्या संसदीय मार्गांचा वापर करून त्यांनी कला, वाणिज्य, विज्ञान, आयुर्वेद आणि समाजकार्य महाविद्यालयांतील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवले. वेतन आयोग, पेन्शन योजना, विद्यापीठीय कायदे आणि शिक्षकांच्या सेवाशर्ती या विषयांवर त्यांचा इतका सखोल अभ्यास होता की, शासनही नवीन कायदा करताना त्यांच्या सल्ल्याचा आदर करत असे. विदर्भातील शेतकरी आत्महत्या आणि कोरडवाहू शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी सिंचन प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे, हा ध्यास त्यांनी घेतला होता. अप्पर वर्धा धरणातून अमरावती शहरासाठी पाणी आणण्याच्या लढ्यात त्यांनी महान भूमिका बजावली. विदर्भाच्या वाट्याचा निधी इतरत्र वळवला जाऊ नये, यासाठी त्यांनी सरकारसोबत सातत्याने कायदेशीर आणि वैचारिक संघर्ष केला. प्रा. बी. टी. देशमुख यांच्या अभ्यासू वृत्तीचे कौतुक पक्षाच्या सीमा ओलांडून सर्वच नेत्यांनी केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचा ‘खरे ज्ञानयोगी’ असा गौरव केला होता आणि विधान परिषदेतील त्यांच्या भाषणांमधून अनेक पिढ्यांनी संसदीय कार्यप्रणाली शिकल्याचे नमूद केले होते. विविध नामांकित सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांनी, संघटनांनी शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या अग्रगण्य योगदानाबद्दल त्यांचा विशेष गौरव व सन्मान केला होता. प्रा. बी. टी. यांचे जीवन म्हणजे अभ्यास, संघर्ष आणि प्रामाणिकपणाचा त्रिवेणी संगम होता. राजकारणात राहूनही त्यांनी कधीही तत्त्वांशी तडजोड केली नाही. त्यांच्या निधनाने शिक्षकांचा हक्काचा आवाज आणि विदर्भाच्या हक्कासाठी लढणारा एक महान ‘ज्ञानयोगी’ हरपला आहे. शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेले अमूल्य योगदान महाराष्ट्राच्या इतिहासात सदैव सुवर्णअक्षरांनी कोरलेले राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
– प्रा. विलास डोईफोडे , सावनेर







