– फळपीक विमा योजनेबाबत शासनाच्या उदासीनतेविरोधात शेतकऱ्यांचा संताप !
– संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र !
मोर्शी तालुका प्रतिनिधी :- राज्यातील फळपीक उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०२६-२७ या वर्षासाठी अद्याप जाहीर करण्यात आलेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. फळपीक विमा योजना राबविण्याबाबत शासनाची भूमिका उदासीन व शेतकरीविरोधी असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी केला आहे.
वाढते तापमान, अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे, दुष्काळ तसेच हवामानातील सततचे बदल यामुळे फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. संत्रा, मोसंबी, आंबा, डाळिंब, केळी यांसारख्या फळपिकांमध्ये शेतकऱ्यांची लाखो रुपयांची गुंतवणूक असते. अशा परिस्थितीत नुकसान झाल्यास फळपीक विमा योजना हीच शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरत असते. मात्र यावर्षी अद्याप शासनाने या योजनेसंदर्भात कोणताही शासन निर्णय जाहीर न केल्याने लाखो शेतकरी चिंतेत आहेत.
रुपेश वाळके यांनी म्हटले आहे की, राज्यातील कृषी उत्पादन वाढीमध्ये फळपिकांचा मोठा वाटा असूनही शासनाकडून फळपीक उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. एकीकडे हवामान बदलामुळे शेती संकटात सापडली आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना संरक्षण देणारी विमा योजना सुरू करण्यास शासन टाळाटाळ करत आहे. ही भूमिका शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणणारी असून शासनाने तातडीने याची दखल घेणे आवश्यक आहे.
यंदा ‘अल निनो’च्या संभाव्य परिणामांमुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. अशा वेळी फळपीक विमा योजना बंद ठेवणे म्हणजे शेतकऱ्यांना संकटाच्या खाईत लोटण्यासारखे असल्याची टीका रुपेश वाळके यांनी केली आहे.
फळपीक विमा योजनेसंदर्भातील शासन निर्णय तात्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना विमा संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अन्यथा राज्यभरातील फळपीक उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी शासनाला दिला आहे.
“फळपीक विमा योजना तात्काळ लागू करा, अन्यथा आंदोलन उभारू!”
“हवामान बदल, गारपीट, अवकाळी पाऊस आणि दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या फळपीक उत्पादक शेतकऱ्यांना संरक्षण देणारी फळपीक विमा योजना अद्याप जाहीर न करणे हा शासनाचा गंभीर निष्काळजीपणा आहे. लाखो शेतकऱ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही. संत्रा, मोसंबी, आंबा, डाळिंब उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात असताना शासनाने तात्काळ फळपीक विमा योजना लागू करावी. अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून राज्यव्यापी जनआंदोलन छेडण्यात येईल. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या या शेतकरीविरोधी धोरणाचा तीव्र निषेध करतो.”
— रुपेश वाळके अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, मोर्शी तालुका







