हंसराज भंडारा/गोंदिया :- भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, भाजपचे अधिकृत उमेदवार अविनाश ब्राह्मणकर ३०२ मते मिळवून विजयी झाले आहेत. मात्र, या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच, पडद्यामागील राजकीय गणितांनी भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर यांना अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने अधिक, म्हणजेच तब्बल १५४ मते मिळाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीकडे संख्याबळ कमी असतानाही ईश्वरकर यांनी मारलेली ही मुसंडी भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
सत्तेच्या ताकदीला काँग्रेस समर्थित उमेदवाराचे आव्हान !
राज्यभरात सत्ताधारी पक्षाने ही निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेदाचा पुरेपूर वापर केला होता. अनेक ठिकाणी निवडणुका बिनविरोध करण्यात आल्या. भंडारा-गोंदियातही भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली होती. एकूण ४५७ मतदारांपैकी भाजपचे संख्याबळ भक्कम होते. परंतु, प्रत्यक्ष मतदानात १ मत अवैध ठरले, तर १५४ मतदारांनी काँग्रेस समर्थित उमेदवाराच्या पारड्यात मते टाकली. काँग्रेस पक्षाची हक्काची मते मर्यादित असताना, ईश्वरकर यांना मिळालेली अतिरिक्त मते ही भाजप आणि सत्ताधारी मित्रपक्षांमधील ‘अंतर्गत नाराजी’ आणि ‘क्रॉस व्होटिंग’चा परिणाम असल्याचे स्पष्ट होत आहे.
नाना पटोलेंच्या ‘गनिमी काव्या’ची चर्चा!
या निवडणुकीत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, खासदार डॉ. प्रशांत पडोळे, माजी आमदार दिलीप बन्सोड, माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या रणनीतीची जोरदार चर्चा रंगली आहे. काँग्रेस नेत्यांनी कोणतीही मोठी गाजावाजा न करता, संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत मतदारांच्या थेट गाठीभेटी घेतल्या होत्या. त्याचाच परिणाम म्हणून सत्तेच्या महाबलाढ्य यंत्रणेला खिंडार पाडण्यात काँग्रेसला यश आले आहे.
हा निकाल केवळ एका जागेचा विजय-पराजय नाही, तर आगामी काळातील बदलत्या राजकीय समीकरणांचे संकेत आहेत. भाजपने जागा जिंकली असली, तरी काँग्रेसने मतदारांचा विश्वास जिंकत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. हा निकाल दोन्ही पक्षांना आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे.
विजयाचा गुलाल भाजपचा, पण चर्चा मात्र काँग्रेसच्या १५४ मतांचीच! भंडारा-गोंदिया विधान परिषद निकालाने भाजप बॅकफूटवर; नाना पटोलेंची रणनीती यशस्वी?
भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते पुढे म्हणाले: “भाजपकडे संख्याबळ जास्त होते, संपूर्ण सरकारी यंत्रणा आणि पैशांचा महापूर होता. तरीही आमच्या काँग्रेस समर्थित उमेदवाराला तब्बल १५४ मते मिळणे हा आमच्या प्रयत्नाचा यश आहे. हा निकाल स्पष्ट करतो की, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांमधील लोकप्रतिनिधीच आता त्यांच्या हुकूमशाहीला कंटाळले आहेत. त्यांनी मतपेटीतून आपला रोष व्यक्त केला आहे.
आमचे नेते आमदार नाना पटोले, आम्ही सर्व सहकाऱ्यांनी कोणतीही हवा न करता थेट मतदारांच्या मनाचा कौल घेतला. भाजपने विजयाचा गुलाल नक्कीच उधळला असेल, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला आहे आणि पोटात धडकी भरली आहे.
राज्यात सत्ताधारी पक्षाची मोठी हवा आणि रसद असतानाही, भंडारा-गोंदियात काँग्रेसने भाजपच्या गणितांना सुरुंग लावला. काँग्रेसकडे अधिकृत मतदारांची संख्या कमी असतानाही ईश्वरकर यांनी १५४ पर्यंत मारलेली मजल ही सत्ताधारी आघाडीतील स्थानिक असंतोष उघड करणारी आहे. आमदार नानाभाऊ पटोले, खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांनी मतदारांच्या घरी जाऊन घेतलेल्या भेटीगाठी आणि केलेले सुप्त नियोजन यामुळेच हे ‘मॅजिक फिगर’ गाठता आले, अशी चर्चा आता रंगली आहे. या निकालामुळे आगामी निवडणुकीत भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार, हे आता निश्चित झाले आहे.
हा भाजपचा नैतिक पराभव आहे! सत्तेची मस्ती, पैसा आणि दडपशाहीच्या जोरावर कागदावर निवडणूक जिंकता येईल, पण लोकप्रतिनिधींची मने जिंकता येत नाहीत, हेच या १५४ मतांनी दाखवून दिले आहे. अपेक्षेपेक्षा अधिक मते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला.
– खासदार डॉ.प्रशांत पडोळे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र




