spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कामठीत पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; एकाच दिवशी दहा जणांना चावा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कामठी :- कामठी शहरात सोमवारी पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घालत एकाच दिवशी दहा नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. मोंढा, लाला ओली, सोनार ओली, कादर झेंडा, नया बाजार आणि कुंभारे कॉलोनी या परिसरात कुत्र्याने वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांवर हल्ले केल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिसाळलेला कुत्रा परिसरात फिरत असताना अचानक नागरिकांवर झडप घालत होता. या हल्ल्यात दहा जण जखमी झाले असून त्यांना तातडीने कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींना आवश्यक वैद्यकीय उपचारांसह रेबीज प्रतिबंधक लसीकरण देण्यात आले.

या घटनेनंतर नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली असून विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाबाबत नगर परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेऊन श्वान पकड मोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, एकाच दिवशी दहा जणांना चावा घेतल्याच्या या घटनेने कामठीतील भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे पुन्हा एकदा प्रशासनाचे लक्ष वेधले असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Popular Articles