spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महापुरुषांच्या विचारांची रंगीत गाथा; रमानगर आरओबी पुलियावरील चित्रांनी वेधले नागरिकांचे लक्ष

संदीप कांबळे,कामठी :- शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या रमानगर येथील रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) पुलियावरील भिंती आता महापुरुषांच्या विचारांचे जिवंत दालन बनल्या आहेत. पुलियावर सम्राट अशोक, राम मंदिर, दीक्षाभूमी यांसह तथागत गौतम बुद्ध, स्वामी विवेकानंद, संत महावीर, महाराणा प्रताप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासह अनेक थोर विभूतींची आकर्षक चित्रे रेखाटण्यात आली असून ती नागरिकांचे लक्ष वेधून घेत प्रेरणेचा संदेश देत आहेत.

रंगीबेरंगी आणि सुबक पद्धतीने साकारण्यात आलेली ही चित्रे केवळ सौंदर्यवृद्धी करत नसून समाजाला इतिहास, समता, शिक्षण आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देण्याचे कार्यही करीत आहेत. युवक आणि विद्यार्थ्यांसाठी ही चित्रे प्रेरणास्थान ठरत असून अनेक नागरिक या चित्रांसमोर थांबून महापुरुषांना अभिवादन करताना दिसून येत आहेत.

सदर उड्डाणपुलाची लांबी 708.68 मीटर असून त्याची रुंदी 7.50 मीटर आहे. पुलाला जोड म्हणून 1.50 मीटर रुंदीचा पदपथही तयार करण्यात आला आहे. या उड्डाणपुलामुळे विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेसकडे पोहोचणे अधिक सोयीचे झाले आहे. तसेच ड्रॅगन पॅलेस येथे आयोजित होणाऱ्या भव्य कार्यक्रमांसाठी येणाऱ्या बससह अवजड वाहनांच्या वाहतुकीसही सुरळीत मार्ग उपलब्ध झाला आहे. याच पुलामुळे भंडारा राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 कडे जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूकही सुलभ झाली असून नागपूर शहर, कामठी शहर आणि ग्रामीण भाग यांना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा ठरला आहे.

विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी विद्युत रोषणाईच्या झगमगाटात ही चित्रे अधिकच खुलून दिसतात. त्यामुळे रमानगर आरओबी पुलाला एक नवी ओळख मिळाली असून हा परिसर सध्या शहरातील आकर्षणाचे आणि चर्चेचे केंद्र बनला आहे. महापुरुषांच्या विचारांची ही रंगीत गाथा जनमानसात प्रेरणेची ज्योत प्रज्वलित करत असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

Popular Articles