spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सीईआयआर पोर्टलचा चमत्कार! नवीन कामठी पोलिसांनी शोधले 25 हरवलेले मोबाईल; मालकांच्या चेहऱ्यावर परतले हास्य

कामठी :- हरवलेला मोबाईल परत मिळणे म्हणजे अनेकांसाठी अशक्यप्राय गोष्ट असते. मात्र, नवीन कामठी पोलिसांनी केंद्रीय उपकरण ओळख नोंदणी (CEIR) पोर्टलच्या मदतीने तब्बल 25 हरवलेले मोबाईल शोधून काढत ते त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देऊन नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ केला आहे.

तांत्रिक तपास आणि सीईआयआर पोर्टलच्या प्रभावी वापरातून नवीन कामठी पोलिसांनी मध्यप्रदेशातून 8, उत्तर प्रदेशातून 5, बिहारमधून 3, नागपूर शहरातून 8 आणि भंडारा येथून 1 असे एकूण 25 मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळविले. विविध राज्यांमध्ये गेलेल्या मोबाईलचा मागोवा घेऊन ते पुन्हा मालकांपर्यंत पोहोचविण्याची ही कारवाई विशेष ठरली.

सोमवारी (दि. 22) नवीन कामठी पोलीस ठाण्यात संबंधित अर्जदारांना बोलावून मोबाईलची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर सीईआयआर पोर्टलवरून मोबाईल अनब्लॉक करून सहाय्यक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर यांच्या हस्ते संबंधित नागरिकांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे, पोलीस उपनिरीक्षक संदीप भिताडे तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

आपला हरवलेला मोबाईल पुन्हा हाती मिळाल्याने अनेक नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. नवीन कामठी पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, मोबाईल हरवल्यास तातडीने सीईआयआर पोर्टलवर नोंदणी करून पोलिसांकडे तक्रार देण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.