spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीचा आदर्श कामठीतील अधिकारी घेणार का?

संदीप कांबळे, कामठी :- राज्यातील प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि धाडसी प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणारे तुकाराम मुंढे पुन्हा एकदा आपल्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव म्हणून त्यांनी अवैध गुटखा, तंबाखू आणि नियमबाह्य व्यावसायिकांविरोधात उघडलेल्या मोहिमेमुळे राज्यभर खळबळ उडाली असून कायद्याच्या कठोर अंमलबजावणीचा नवा आदर्श निर्माण केला आहे.

तुकाराम मुंढे यांच्या कारकीर्दीचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही राजकीय दबावाला किंवा वैयक्तिक स्वार्थाला बळी न पडता जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देत घेतलेले कठोर आणि धाडसी निर्णय. वारंवार होणाऱ्या बदल्या, विरोध आणि विविध अडथळ्यांनाही न जुमानता त्यांनी आपल्या कर्तव्याची वाट कधीही सोडली नाही. त्यामुळेच सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्या कार्यशैलीबद्दल विश्वास, आदर आणि अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर कामठी तालुक्यातील अनेक जागरूक नागरिक एक प्रश्न उपस्थित करीत आहेत— “तुकाराम मुंढे यांच्यासारखी निर्भीड, पारदर्शक आणि कर्तव्यनिष्ठ कार्यशैली येथील प्रशासकीय अधिकारी का स्वीकारत नाहीत?”

मागील १२ जून रोजी अन्न व औषध प्रशासन विभाग नागपूर आणि गुन्हे शाखा नागपूर यांच्या संयुक्त कारवाईत कामठी तालुक्यातील आवंडी येथील अरिहंत कोल्ड स्टोरेजवर धाड टाकण्यात आली होती. या कारवाईत तब्बल १ कोटी ११ लाख ७ हजार रुपयांची सुपारी जप्त करण्यात आली असून संबंधित गोदाम सील करण्यात आले. या कारवाईनंतर कामठी शहरातील अनेक पानठेले चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी आपले व्यवसाय तात्पुरते बंद ठेवले असल्याचे चित्र दिसून आले.

मुंढे यांच्या धडक कारवायांमुळे अवैध धंद्यांवर नियंत्रण येण्यास मदत झाली असून कायद्याचा धाक निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाकडूनही अशाच प्रकारच्या प्रभावी आणि निष्पक्ष कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, कामठी तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जनहित, पारदर्शकता, जबाबदारी आणि भ्रष्टाचाराविरोधातील शून्य सहनशीलता ही तत्त्वे स्वीकारल्यास प्रशासनावरील लोकांचा विश्वास अधिक दृढ होऊ शकतो. वाढते अतिक्रमण, अवैध व्यवसाय, वाहतूक समस्या आणि विविध नागरी प्रश्नांवर कठोर भूमिका घेतल्यास विकासाला निश्चितच गती मिळू शकते.

तुकाराम मुंढे यांचे कार्य हे केवळ एका अधिकाऱ्याचे यश नसून लोकाभिमुख, पारदर्शक आणि जबाबदार प्रशासनाचे प्रतीक मानले जाते. आता प्रश्न एवढाच आहे की, त्यांच्या या आदर्श कार्यशैलीचा वारसा इतर प्रशासकीय अधिकारीही पुढे नेतील का? याकडे कामठीकरांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Popular Articles