– अली खामनेई रक्त मदत संस्थेच्या भव्य शिबिरात 276 रक्तदात्यांचा सहभाग
कामठी :- मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा या भावनेतून अली खामनेई रक्त मदत संस्था, कामठी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. समाजातील विविध घटकांतील नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवत तब्बल 276 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले.
रक्ताची गरज असलेल्या रुग्णांसाठी हे शिबिर आशेचा किरण ठरले. “रक्तदान हे महादान” या संदेशाला प्रत्यक्ष कृतीत उतरवत युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले. या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळण्यास मदत होणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष नजर जाफरी, संस्थापक कामरान जाफरी तसेच असगर हसन, हसन अली, माहिर हुसैन, आमिर रझा, शादिक अली, नैय्यर अब्बास आणि वाकर हसन यांनी सर्व रक्तदाते, स्वयंसेवक, सहकारी संस्था आणि उपस्थित नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले. शिबिराच्या यशस्वीतेत स्वयंसेवकांचे अथक परिश्रम आणि समाजातील विविध घटकांचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
“रक्तदान – जीवनदान” हा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचवत हे शिबिर सामाजिक एकोपा, मानवता आणि सेवाभावाचे जिवंत उदाहरण ठरले. कामठी शहरातील हा उपक्रम इतर सामाजिक संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरत असून, समाजहितासाठी अशाच विधायक उपक्रमांची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.




