– डॉ. पुरणचंद्र मेश्राम सहासष्टीपूर्ती अभीष्टचिंतन सोहळा
कामठी:- व्यक्तीच्या विकासात तत्त्वाचे अधिष्ठान फार महत्त्वाचे असते. विचारांशी तडजोड करून माणसाला मोठे होता येते, अनेक लोक तशी तडजोड सहज करतात, मात्र डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांनी कधीही विचारांशी व जीवननिष्ठेशी तडजोड केली नाही, अन्यथा तेसुद्धा आज राजकारणातील मोठ्या पदावर दिसले असते. तर्कनिष्ठा, तत्त्वनिष्ठा व विवेकनिष्ठा या तीन गुणांनी त्यांना अतुल्य आणि अनुकरणीय केले आहे. समाजाला अशा चालत्याबोलत्या रोलमॉडेलची गरज आहे, असे गौरवोउद्गार दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्थेचे प्रमुख सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी काढले. समाजकार्य महाविद्यालय कामठीच्या वतीने महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांचा सहासष्टीपूर्ती अभीष्टचिंतन सोहळा रविभवन येथील सभागृहात रविवारी संपन्न झाला .या प्रसंगी ते बोलत होते.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे हे होते. सत्कारमूर्ती डॉ. पुरणचंद्र मेश्राम, त्यांच्या सुविद्य पत्नी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाच्या प्रोफेसर. डॉ. राजश्री मेश्राम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश चिमणकर, गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रुबीना अन्सारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्रकुलगुरु डॉ. अखिलेश पेशवे म्हणाले, डॉ मेश्राम यांनी विद्या व प्रशाकिय कौशल्याच्या बळावर आपल्या अतिसामान्य परिस्थितीवर मात करीत स्वतःचे असामान्यत्व सिद्ध केले.विदयापीठात विविध सामाजिक प्रकल्प थांबवुन विद्यापीठाला सामाजिक चेहरा देणारे ते पहिले कुलसचिव ठरले. ्डॉ. मेश्राम यांनी विद्यापीठाला आपली आई मानून विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतःला झोकून दिले होते. कोणत्याही भीतीला न जुमानता निडरपणे मोठमोठी आव्हाने पेलून दाखविली, विद्यापीठाला अतिक्रमणातून मुक्त केले. माणसाने धैर्याने कसे जगावे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. समाजहित जपणाऱ्या अशा दुर्मिळ व्यक्तीची देशाला गरज असल्याने ही व्यक्ती शतायुषी व्हावी, असेही ते म्हणाले.
, सकाळचे संपादक प्रमोद काळबांडे म्हणाले की डॉ. मेश्राम हे आंबेडकरी चळवळीतील क्रांतिकारी कार्यकर्ते आहेत. आंबेडकरी चळवळीत काम करताना मोठे व्हायला खूप उशीर लागतो. त्यांच्यासारखे आंबेडकरी बाण्याचे प्रशासकीय नेते आजच्या काळात शोधूनही सापडणार नाहीत. आजच्या वाकणाऱ्या,विकणाऱ्या, झुकणाऱ्या कालखंडात भाऊ ताठपणे उभे आहेत.आजच्या अस्वस्थ वर्तमानात वंचितांचा आवाज बुलंद करण्यासाठी त्यांच्यासारख्या पोलादी नेतृत्वाची गरज आहे असे ते म्हणाले.
डॉ. ओमप्रकाश चिमणकर म्हणाले, डॉ. मेश्राम यांचा कार्यकाळ हा विद्यापीठातील शिक्षक व कर्मचाऱ्यासाठी सुवर्ण काळ ठरला .त्यांनी आपल्या प्रशासकिय कौशल्याच्या बळावर मागासवर्गीयांचा अनुषेश भरला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले शिक्षक व कर्मचाऱ्यांची पदोन्नती व अनेक प्रश्न मार्गी लावुन त्यांना न्याय मिळवून दिला.राज्य शासनाने त्यांचे ज्ञान व कौशल्याचा उपयोग राज्यातील आरक्षण व उपवर्गीकरणा सारखे बिकट प्रश्न सोडविण्यासाठी करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. अनिल हिरेखण म्हणाले, डॉ. मेश्राम हे माणसं घडविणारं व्यक्तिमत्त्व आहे.त्यांनी विद्यापीठात व समाजात माझ्यासारखे अनेक अधिकारी व माणसं घडविली.व त्यांना धोरण प्रक्रियेत सहभागी केले.संविधान पार्कची निर्मिती, आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट सेंटरची उभारणी व डॉ. आंबेडकर यांच्यावरील मौलिक ग्रंथाची निर्मिती हे त्यांचे ऐतिहासिक कार्य अविस्मरणीय राहील.
सत्काराला उत्तर देताना डॉ. मेश्राम म्हणाले, आयुष्यात मला प्राप्त झालेल्या पदाला जीवनाचे ” साध्य” समजले नाही.त्याला” साधन” म्हणून लोकांना न्याय देण्यासाठी केला.विदयापीठ प्रशासनात भेदभावाच्या भिंती तोडून समानतेच्या मुल्यांवर विद्यापीठ प्रशासन चालवुन विद्यापीठाला लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला. किती वर्षे जगलो यापेक्षा मी योग्य दिशेने व तत्वमुल्यांशी सुसंगत जगलो याचा मला सार्थ आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. .
या प्रसंगी डॉ राजश्री मेश्राम व प्राचार्या डॉ रुबीना अंसारी यांचे समयोचित भाषण झाले.याप्रसंगी डाॅ.नीरज बोधी, भैय्याजी खैरकर , विनोद थुल, डॉ. श्रीकांत भोवते, प्राचार्य महेंद्रकुमार मेश्राम, उदय टेकाडे, डॉ. जयंत रामटेके, डॉ. वंदना इंगळे इत्यादी मान्यवरांनी डॉ. पुरण मेश्राम यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनी केले तर आभार डॉ. राम बुटके यांनी मानले




