spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बिगर सातबारा शेतकरी संघटनेची नागपुरात महत्त्वपूर्ण बैठक : आंदोलनाचा ठराव मंजूर

नागपूर :- बिगर सातबारा शेतकरी संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी नागपुरात उत्साहात पार पडली. संघटनेचे प्रणेते जगदीश कुमार इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आगामी पावसाळी अधिवेशनात शासनाने ‘सर्वांसाठी शेतीचे धोरण’ जाहीर करून बिगर सातबारा धारक व भूमिहीन शेतकऱ्यांची शेतीवरील अतिक्रमणे नियमित करावीत, या मागणीसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. बैठकीत बोलतांना जगदीश कुमार इंगळे यांनी सांगितले की, राज्यातील भूमिहीन व बिगर सातबारा धारक शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आता निर्णायक लढा उभारण्याची वेळ आली आहे. शासनाने चालू पावसाळी अधिवेशनात सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर येथील ‘रवी भवन’ निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. बैठकीत आगामी पावसाळी अधिवेशनात ‘सर्वांसाठी शेतीचे धोरण’ जाहीर करण्यासाठी शासनावर दबाव आणणे, गरिब व भूमिहीन शेतकऱ्यांची शेतीवरील अतिक्रमणे नियमित करण्यासाठी शासन निर्णय (जीआर) काढण्याची मागणी करणे तसेच मागण्या मान्य न झाल्यास महसूलमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर एकजुटीने आंदोलन करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या बैठकीला संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने बिगर सातबारा धारक शेतकरी उपस्थित होते. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा राज्यव्यापी तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा बैठकीच्या शेवटी देण्यात आला.

Popular Articles