spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कोट्यवधींचे देणे रखडल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ; हिरालाल नागपुरे यांची रोहयो मंत्र्यांकडे मागणी

– मनरेगाचा कुशल व अकुशल निधी तातडीने वितरित करा!

हंसराज तुमसर :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) तुमसर तालुक्यात झालेल्या सार्वजनिक व वैयक्तिक कामांचा कुशल निधी तसेच मजुरांचा अकुशल निधी तत्काळ वितरित करण्यात यावा, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश सचिव तथा तुमसर पंचायत समितीचे माजी उपसभापती हिरालाल नागपुरे यांनी रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

भंडारा जिल्ह्यातील तुमसर पंचायत समिती अंतर्गत मनरेगा योजनेतून मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक व वैयक्तिक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून या कामांचा कोट्यवधी रुपयांचा कुशल व अकुशल निधी शासनाकडे प्रलंबित आहे.

सध्या तुमसर तालुक्यात – मजुरांचा अकुशल निधी : ४८८.६५ लाख रुपये – वैयक्तिक कामांचा कुशल निधी : १९७.३२ लाख रुपये – सार्वजनिक कामांचा कुशल निधी : ११०३.४६ लाख रुपये असा तब्बल १७ कोटींहून अधिक रुपयांचा निधी शासन स्तरावर रखडला आहे. अकुशल मजुरी वेळेवर न मिळाल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या गरीब मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच वैयक्तिक लाभाच्या योजना पूर्ण करूनही कुशल निधी न मिळाल्याने लाभार्थी शेतकरी व नागरिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

दुसरीकडे, सार्वजनिक कामांचे देयक वेळेत न निघाल्यामुळे संबंधित निविदाधारक व कंत्राटदारांकडून ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांना व प्रशासनाला वारंवार त्रास सहन करावा लागत आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता शासनाने कोणतीही दिरंगाई न करता प्रलंबित असलेला संपूर्ण निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी हिरालाल नागपुरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

Popular Articles