नागपूर :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या प्रेरणादायी जीवनकार्यावर आधारित ‘युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार’ या भव्य हिंदी महानाट्याचा ५१ वा प्रयोग सोमवारी , २९ जून रोजी, सायंकाळी ६ वाजता. मुंबईतील प्रभादेवी, दादर येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे सादर करण्यात येणार आहे. या विशेष प्रयोगाला महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल जिष्णु देव शर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच महानाट्याला ज्येष्ठ प्रचारक रवी भुसारी यांचे संरक्षक व मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन लाभले आहे. ‘नादब्रह्म’, नागपूर निर्मित या भव्य महानाट्याचे निर्माते पद्माकर धानोरकर असून लेखन डॉ. अजय प्रधान यांनी केले आहे. दिग्दर्शन सुबोध सुर्जीकर यांचे असून संगीत शैलेश दाणी यांनी दिले आहे. महानाट्यात डॉ. हेडगेवार यांच्या प्रमुख भूमिकेत सतीश खेकाळे झळकणार असून रमेशचंद्र दीक्षित, मंगेश बावसे, अमोल तेलपांडे, प्रशांत मंगदे, विनय लोहित यांच्यासह सुमारे ३५ कलाकार विविध भूमिका साकारत आहेत.
या महानाट्याचे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील विविध शहरांमध्ये यशस्वी प्रयोग झाले असून प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. आगामी काळात हरियाणा, बिहार, दिल्ली, उत्तराखंड आणि गुजरात या राज्यांमध्येही या महानाट्याचे प्रयोग आयोजित करण्यात येणार आहेत. डॉ. हेडगेवार यांची राष्ट्रभक्ती, संघटन कौशल्य, दूरदृष्टी आणि सामाजिक कार्याचा प्रेरणादायी प्रवास प्रभावी नाट्यमय शैलीत या महानाट्यातून उलगडण्यात आला आहे. या प्रयोगास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक व निर्माते पद्माकर धानोरकर यांनी केले आहे.




