spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जागतिक संस्कृत परिषदेत नागपूरच्या तृप्ती शेळके (उमाळे) यांच्या संशोधनाची विशेष दखल

– थायलंड येथे आयोजित पाचव्या जागतिक संस्कृत परिषदेत संशोधनपर निबंधाला विशेष प्रशंसा; भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक शिक्षणाचा प्रभावी संगम मांडला

नागपूर :- भारतीय संस्कृती, संस्कृत भाषा आणि प्राचीन ज्ञानपरंपरेचा आधुनिक शिक्षणाशी असलेला अनुबंध जागतिक स्तरावर अधोरेखित करत नागपूरच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढविणारी उल्लेखनीय कामगिरी भवन्स बी.पी.विद्या मंदिर, त्रिमूर्तीनगर येथील संस्कृत शिक्षिका श्रीमती तृप्ती शेळके (उमाळे) यांनी केली आहे. थायलंड येथे आयोजित पाचव्या जागतिक संस्कृत परिषदेत त्यांनी सादर केलेल्या संशोधनपर निबंधाची विशेष दखल घेण्यात आली असून, त्यांच्या संशोधनात्मक मांडणीला विशेष प्रशंसा प्राप्त झाली आहे. त्यांच्या या यशामुळे नागपूरच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. थायलंड येथे आयोजित या आंतरराष्ट्रीय परिषदेत विविध देशांतील संस्कृत अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक आणि विद्वान सहभागी झाले होते. संस्कृत भाषा, भारतीय तत्त्वज्ञान, प्राचीन ज्ञानपरंपरा तसेच आधुनिक काळातील संस्कृतच्या उपयुक्ततेवर या परिषदेत विविध विषयांवर विचारमंथन करण्यात आले. अशा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नागपूरच्या शिक्षिकेला आपले संशोधन सादर करण्याची संधी मिळणे ही विशेष अभिमानाची बाब ठरली आहे. तृप्ती शेळके (उमाळे) यांनी ‘संस्कृतवाङ्मये निहितानां भारतीय ज्ञानपरम्परातत्त्वानां समकालीन शिक्षणे पुनःसन्दर्भीकरणम्’ अर्थात ‘संस्कृत वाङ्मयातील भारतीय ज्ञानपरंपरेतील तत्त्वांचे समकालीन शिक्षणात पुनर्संदर्भीकरण’ या महत्त्वपूर्ण विषयावर आपला संशोधनपर निबंध सादर केला. संस्कृत वाङ्मयामध्ये समृद्ध स्वरूपात उपलब्ध असलेल्या भारतीय ज्ञान परंपरेतील तत्त्वांचा आधुनिक शिक्षण व्यवस्थेत कशा प्रकारे प्रभावीपणे उपयोग करता येईल, याचे सखोल विवेचन त्यांनी आपल्या संशोधनातून केले. प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये ज्ञानाला केवळ माहिती मिळविण्याचे साधन न मानता व्यक्तिमत्त्व विकास, चारित्र्य निर्मिती, नैतिक मूल्यांची जोपासना आणि समाज कल्याणाचे माध्यम मानले गेले आहे. वेद, उपनिषदे, भगवद्गीता तसेच विविध संस्कृत ग्रंथांमध्ये जीवनमूल्ये, तत्त्वज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवी संबंध आणि सामाजिक जबाबदारी यांसंदर्भातील मौलिक विचार आढळतात. या विचारांचा आजच्या शिक्षणपद्धतीशी समन्वय साधल्यास विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळू शकते, हा महत्त्वाचा दृष्टिकोन त्यांनी आपल्या संशोधनातून मांडला. आजच्या बदलत्या शैक्षणिक परिस्थितीत विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून त्यांच्यामध्ये चिकित्सक विचारक्षमता, सर्जनशीलता, नैतिक जाणीव, सामाजिक बांधिलकी आणि आत्मविश्वास विकसित करणे आवश्यक आहे. संस्कृत वाङ्मयातील ज्ञानसंपदा आधुनिक अध्यापन पद्धतींशी जोडून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, नैतिक आणि सामाजिक विकासासाठी कशी उपयोगी ठरू शकते, याची विविध अंगांनी त्यांनी चर्चा केली. भारतीय ज्ञानपरंपरेचा आधुनिक शिक्षणाशी योग्य समन्वय साधल्यास विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षणाची रुजवण, वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना आणि भारतीय संस्कृती विषयी अभिमानाची भावना निर्माण होण्यास मदत होऊ शकते. प्राचीन ज्ञानाचा केवळ गौरव करण्याऐवजी त्यातील उपयुक्त तत्त्वांचा वर्तमान काळातील शैक्षणिक गरजांनुसार पुनर्विचार आणि पुनर्वापर करणे महत्त्वाचे आहे, हा त्यांच्या संशोधनाचा प्रमुख आशय होता. त्यामुळे त्यांच्या निबंधाला शैक्षणिक आणि संशोधनात्मक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले. या आंतरराष्ट्रीय परिषदेत विविध देशांतील विद्वान आणि संशोधकां समोर आपले संशोधन सादर करतांना तृप्ती शेळके (उमाळे) यांनी संस्कृत वाङ्मयातील विचारांची आधुनिक संदर्भातील उपयुक्तता प्रभावीपणे स्पष्ट केली. त्यांच्या विषयाची निवड, संशोधनाची मांडणी आणि शिक्षणक्षेत्राशी असलेली त्याची सांगड यांचे विशेष कौतुक करण्यात आले. त्यांच्या संशोधनपर निबंधाची विशेष प्रशंसा करून त्यांच्या शैक्षणिक योगदानाची दखल घेण्यात आली.

परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात भारताचे थायलंड मधील राजदूत पुनीत अग्रवाल आणि पद्मश्री डॉ. चिरापत प्रपनविद्या यांच्या हस्ते तृप्ती शेळके (उमाळे) यांचा सत्कार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या मान्यवरांच्या हस्ते झालेला सन्मान त्यांच्या संशोधन कार्यासाठी महत्त्वपूर्ण गौरव ठरला. जागतिक संस्कृत परिषदेचे अध्यक्ष राजेश मिश्रा तसेच अन्य तज्ज्ञ आणि संशोधकांनी त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन करून पुढील संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या. या यशामागे भवन्स बी. पी. विद्या मंदिर, त्रिमूर्तीनगरच्या प्राचार्या सौ.पार्वती जी.अय्यर यांचे विशेष योगदान असल्याचे सांगण्यात आले. त्यांनी तृप्ती शेळके (उमाळे) यांना सातत्याने मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि सहकार्य केले. शिक्षकांना अध्यापना बरोबरच संशोधना साठी प्रेरित करणारे शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यात संस्थेची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. त्यांच्या या प्रोत्साहनामुळे तृप्ती शेळके यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले संशोधन सादर करण्याची संधी मिळाली. संस्कृत ही केवळ प्राचीन भाषा नसून भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान, साहित्य आणि ज्ञानपरंपरेचा अमूल्य वारसा आहे. या भाषेतील ज्ञान आधुनिक काळातील शिक्षण, विज्ञान, सामाजिक विचार आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी कसे उपयुक्त ठरू शकते, याचा अभ्यास आणि प्रसार होणे काळाची गरज आहे. तृप्ती शेळके (उमाळे) यांच्या संशोधनामुळे या विचारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळाले असून, संस्कृतच्या अभ्यासाला आधुनिक शैक्षणिक संदर्भ जोडण्याच्या प्रयत्नांना नवी दिशा मिळाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेतील सहकारी शिक्षकवृंद, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि परिचितांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यातही त्यांच्याकडून अशाच प्रकारचे संशोधनकार्य घडावे आणि भारतीय ज्ञानपरंपरेचा जागतिक स्तरावर अधिक व्यापक प्रसार व्हावा, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत. थायलंडमधील जागतिक संस्कृत परिषदेत मिळालेली विशेष प्रशंसा ही केवळ तृप्ती शेळके (उमाळे) यांची वैयक्तिक उपलब्धी नसून नागपूरच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आणि भारतीय ज्ञानपरंपरेच्या जागतिक प्रसारासाठी अभिमानास्पद ठरणारी कामगिरी आहे.

Popular Articles