नागपूर :- वीज ग्राहकांना अधिक सक्षम, पारदर्शक आणि प्रगत सेवा देण्यासाठी महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम वेगाने राबवली जात आहे. नागपूर परिमंडळात आतापर्यंत ५.५० लाखांहून अधिक ग्राहकांकडे स्मार्ट मीटरची यशस्वी स्थापना करण्यात आली असून, या तंत्रज्ञानामुळे वीज बिलिंग प्रक्रियेत आमूलाग्र बदल होत आहेत.
स्मार्ट मीटरबाबत काही गैरसमज पसरले असले तरी, वस्तुस्थिती पाहता हे मीटर ग्राहकांच्या फायद्याचेच असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. स्मार्ट मीटरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामुळे वीज वापराची अचूक आणि रिअल-टाइम माहिती उपलब्ध होते. मानवी हस्तक्षेप कमी झाल्यामुळे बिलिंग प्रक्रियेत पारदर्शकता आली असून, रीडिंगमधील मानवी चुकांना पूर्णपणे आळा बसला आहे. विशेष म्हणजे, दिवसा वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हे मीटर अत्यंत फायदेशीर ठरत आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीज वापरल्यास ग्राहकांना प्रति युनिट ८५ पैशांपर्यंत सवलत मिळू शकते, ज्यामुळे वीज बिलात मोठी बचत करणे शक्य होणार आहे.
स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढते, या दाव्याचे महावितरणने खंडन केले आहे. उन्हाळ्याच्या काळात एसी, कुलर आणि पंख्यांचा वापर वाढल्यामुळे वीज वापर वाढतो आणि परिणामी बिल वाढते, याचा स्मार्ट मीटरच्या कार्यक्षमतेशी कोणताही संबंध नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, हे मीटर पूर्णपणे सुरक्षित असून, ते बीआयएस (BIS) मान्यताप्राप्त आणि एएमआय (AMI) तंत्रज्ञानावर आधारित आहेत. सायबर सुरक्षेचे कडक नियम पाळून हे मीटर कार्यरत आहेत.
या मीटरसाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही, हे विशेष. सौर ऊर्जा प्रकल्प असलेल्या ग्राहकांनाही या मीटरमुळे वापराचे नेमके मोजमाप समजत असल्याने, सौर प्रकल्पाची क्षमता आणि प्रत्यक्ष वापर यांचा ताळमेळ राखणे सोपे झाले आहे.
कोणतीही अफवा न पसरवता ग्राहकांनी अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा आणि शंका असल्यास नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी केले आहे.




