spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

घटस्फोटानंतर दुसऱ्याच दिवशी तरुणीची भरदिवसा निर्घृण हत्या; कामठी हादरली

कामठी :- कामठी शहरातील गजबजलेल्या शुक्रवारी बाजार परिसरात भरदिवसा घडलेल्या एका निर्घृण हत्येने संपूर्ण शहर हादरले आहे. रुईगंज मैदानाजवळील दरोगा मशिदीकडे जाणाऱ्या गल्लीत २४ वर्षीय घटस्फोटित तरुणीची अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने वार करून हत्या केली.शुक्रवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता घडलेल्या या घटनेमुळे बाजारपेठेत एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत तरुणीचे नाव मंजू संदीप पचारे (वय २४, रा. वारिसपुरा, कामठी) असे असून तिचे माहेरचे नाव मंजू राजकुमार पारसे आहे. काही वर्षापूर्वी तिचा विवाह वर्धा जिल्ह्यातील पाचखेळ (ता. पुलगाव) येथील संदीप पचारे यांच्याशी झाला होता. कौटुंबिक कारणांमुळे गुरुवारी दोघांचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर ती माहेरी परतली होती.

शुक्रवारी बाजार असल्याने परिसरात मोठी गर्दी होती. मंजू रुईगंज मैदानातून दरोगा मशिदीकडे जाणाऱ्या गल्लीतून जात असताना तोंडाला स्कार्फ बांधलेल्या अवस्थेत तिचा पाठलाग करणाऱ्या अज्ञात आरोपीने संधी साधून तिच्यावर छाती, मान आणि पायावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच जुनी कामठी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिघे, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मेश्राम आणि पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे आरोपीचा कसून शोध घेत आहेत. भरदिवसा गजबजलेल्या बाजारात घडलेल्या या हत्येमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Popular Articles