spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रतिभास्थली ज्ञानोदय विद्यापीठाचा डंका

– १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने पटकावले तृतीय स्थान; चुरशीच्या उपांत्य सामन्यात काटोलकडून निसटता पराभव

रामटेक :- आनंद नगर येथील हनुमान मंदिराजवळील व्हॉलीबॉल मैदानावर शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी आयोजित जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रतिभास्थली ज्ञानोदय विद्यापीठ, रामटेकच्या १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने दमदार कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. विविध तालुक्यांमधून आलेल्या १६ संघांच्या सहभागामुळे स्पर्धेला चांगलीच रंगत आली होती. मौदा, हिंगणा, सावनेर, नरखेड, कामठी, कळमेश्वर, पारशिवणी तसेच नागपूर ग्रामीण आदी भागांतील संघांनी स्पर्धेत सहभाग घेत आपले क्रीडाकौशल्य पणाला लावले. प्रतिभास्थली ज्ञानोदय विद्यापीठाच्या संघाने सुरुवातीपासूनच आत्मविश्वासपूर्ण आणि शिस्तबद्ध खेळाचे प्रदर्शन केले. संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट सर्व्हिस, अचूक पासिंग, प्रभावी स्मॅश तसेच बचावात्मक खेळाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांसमोर कडवे आव्हान उभे केले. संघातील प्रत्येक खेळाडूने सांघिक भावनेने खेळ करत विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. उपांत्य फेरीतील सामना रामटेक आणि काटोल या दोन संघांमध्ये अत्यंत चुरशीचा झाला. सामन्यात दोन्ही संघांनी आक्रमक आणि उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्याने उपस्थित क्रीडाप्रेमींची उत्सुकता वाढली. अखेर १५-१६ आणि ९-१५ अशा अटीतटीच्या गुणफरकाने रामटेकच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला. मात्र, या निसटत्या पराभवा नंतरही संघातील खेळाडूंनी खचून न जाता स्पर्धेतील आपली गुणवत्ता कायम राखली आणि तृतीय स्थानावर नाव कोरून रामटेकच्या क्रीडा क्षेत्राची मान उंचावली. या संघाचे नेतृत्व कर्णधार आदिती हिने केले. तिच्यासोबत सावी, सिद्धी, तन्वी, आर्या, आर्या जानवे, रिया, सर्वज्ञ, रुचिता, समृद्धी, सायली, अनन्या, दिया, अंजली आणि प्रियल या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक कामगिरी बजावली. सर्व खेळाडूंनी मैदानावर दाखविलेली जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि सांघिक समन्वय हे या यशाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. या यशामागे प्रतिभास्थली ज्ञानोदय विद्यापीठाच्या प्राचार्या रजनी, मोनिका तसेच क्रीडा शिक्षिका रिचा यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींना सातत्याने प्रोत्साहन देत त्यांच्या क्रीडागुणांना योग्य दिशा देण्याचे काम त्यांनी केले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे मागील दहा वर्षांपासून मोफत क्रीडा सेवा देणारे राज्यस्तरीय व्हॉलीबॉल पंच, प्रशिक्षक तसेच आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स खेळाडू सोनू बेठेकर यांनी या विद्यार्थिनींना प्रशिक्षण दिले. अत्यंत गरजू आणि होतकरू मुलींना अवघ्या अडीच महिन्यांच्या कालावधीत कठोर सराव, शिस्त आणि तांत्रिक मार्गदर्शन देत स्पर्धेसाठी तयार करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. अल्पावधीत घेतलेल्या या कठोर प्रशिक्षणाचे फलित जिल्हास्तरीय स्पर्धेतील तृतीय क्रमांकाच्या रूपाने मिळाले असून, प्रतिभास्थली ज्ञानोदय विद्यापीठातील विद्यार्थिनींमध्ये क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय क्षमता असल्याचे या यशातून अधोरेखित झाले आहे. शिक्षणा सोबतच विद्यार्थ्यांनी शारीरिक तंदुरुस्ती आणि क्रीडा क्षेत्रा कडेही गांभीर्याने पाहावे, असा संदेश या कामगिरीतून देण्यात आला आहे. यावेळी रामटेक वासीयांना मार्गदर्शन करताना खेळाडू आणि प्रशिक्षकांनी मुलांना मोबाईल व विविध स्क्रीनपासून काही काळ दूर ठेवून त्यांच्या आरोग्यासाठी दररोज किमान एक तास मैदानावर खेळण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले. नियमित खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच आत्मविश्वास, शिस्त, एकाग्रता आणि सांघिक भावना विकसित होण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगितले. प्रतिभास्थली ज्ञानोदय विद्यापीठाच्या १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मिळविलेल्या या यशाबद्दल खेळाडू, प्रशिक्षक, प्राचार्या, क्रीडा शिक्षिका आणि संपूर्ण विद्यालयाचे विविध स्तरांतून कौतुक व अभिनंदन होत आहे. या कामगिरीमुळे रामटेकच्या क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाली असून, भविष्यात या खेळाडूंकडून आणखी मोठ्या यशाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Popular Articles