हंसराज,भंडारा :- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज मोहाडी तालुक्यातील हिवरा, जाम , धोप व कांद्री तसेच तुमसर तालुक्यातील देव्हाडा सुकळी, पालोरा येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. मागील काळात पावसाचा मोठा खंड पडल्याने तसेच त्यानंतरही अपेक्षित पाऊस न झाल्याने पिकांवर झालेल्या परिणामांची यावेळी पाहणी करण्यात आली.
यावेळी पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, पिकांची सद्यस्थिती तसेच निर्माण झालेल्या समस्यांची माहिती घेतली. पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम, अपेक्षित उत्पादनात होणारी घट आदी बाबी शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्या.
परिस्थितीची वस्तुनिष्ठ नोंद घेऊन कृषी व महसूल विभागाने आवश्यक पंचनामे करावेत आणि प्रत्यक्ष पीक नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करावा, अशा सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच सध्याच्या हवामान परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आवश्यक उपाययोजना व कृषीविषयक मार्गदर्शन तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले.
यावेळी अनेक शेतकऱ्यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यात यावा, तसेच दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये मोहाडी व तुमसर तालुक्याचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी केली. शेतकऱ्यांच्या विविध अडचणी व मागण्यांची यावेळी पालकमंत्र्यांनी माहिती घेतली.
नैसर्गिक आपत्ती अथवा प्रतिकूल हवामानामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास शासनाच्या निर्धारित निकषांनुसार शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केली जाते. नुकसानीचे पंचनामे, वस्तुनिष्ठ अहवाल आणि शासनाच्या निकषांनुसार पुढील कार्यवाही करण्यात येते.
शेतकऱ्यांच्या अडचणींची प्रत्यक्ष पाहणी करून त्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या दृष्टीने हा दौरा करण्यात आला. यावेळी आमदार राजू कारेमोरे, आमदार परिणय फुके, महसूल ,कृषी व संबंधित विभागांचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.








