spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

परीक्षा पारदर्शक होण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ पुढे ढकलण्याचा निर्णय

मुंबई :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी राज्यभरातील १,०२८ केंद्रांवर आयोजित करण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ पुढे ढकलण्यात आली असल्याचे परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे, परीक्षा प्रक्रीया पारदर्शकतेत होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत टीईटी परीक्षा सुरक्षित व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तथापि, दि. २७ जून २०२६ रोजी पहाटे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार भिवंडी येथे काही व्यक्तींना टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत माहिती असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानुसार भिवंडी पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकून तपासणी केली.

या प्रकरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी बोलावून पडताळणी करण्यात आली. तपासादरम्यान संबंधित व्यक्तींकडे आढळलेल्या काही प्रश्न आणि शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) जून २०२६ च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न समान असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडावी, तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याने दि. २८ जून २०२६ रोजी नियोजित टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आला आहे.

टीईटी परीक्षेच्या नव्या तारखेसह इतर अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे परिषदेकडून कळविण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.