हंसराज,वरठी :- तालुक्यातील अवैध रेती उत्खनन, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात वरठी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत वैनगंगा आणि सूर नदीपात्रातून एकूण ३६ लाख ३७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी ३ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन वरठी येथील पथक परिसरात गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, खमाटा टाकळी आणि पांजरा येथील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर रेतीची चोरी सुरू आहे. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तात्काळ मौजा खमाटा टाकळी येथील वैनगंगा नदीपात्र आणि मौजा पांजरा येथील सूर नदीपात्रात पंचांसमक्ष धाड टाकली.
पोलिसांचे वाहन येत असल्याचे पाहून कारवाईच्या भीतीने रेती तस्करी करणारे ट्रॅक्टर चालक आपले वाहन आणि ट्रॉली घटनास्थळावरच सोडून पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळाची कसून पाहणी केली असता, तेथे ६ ट्रॅक्टर, ६ ट्रॉली, ६ ब्रास रेती आणि उत्खननासाठी वापरण्यात आलेले साहित्य असा एकूण ३६ लाख ३७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
याप्रकरणी अवैध रेती उत्खनन आणि चोरी करणाऱ्या ट्रॅक्टर चालक व मालकांविरुद्ध वरठी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५८/२०२६ , ३५९/२०२६ व ३६०/२०२६ (BNS कलम ३०३(२), ३(५)) अन्वये एकूण ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवाल्दार बुरडे, रितेंद्र, पोलीस नाईक ईश्वरकर व वरठी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरठी पोलीस करीत आहेत.




