– जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृतीचा संदेश
कामठी :- अमली पदार्थांचे वाढते व्यसन हे आजच्या समाजासमोरील सर्वात गंभीर सामाजिक आणि आरोग्यविषयक संकट बनले आहे. या संकटावर मात करण्यासाठी नागपूर शहर पोलीस आयुक्तालय तर्फे ऑपरेशन थंडर या मोहिमे अंतर्गत व्यसनमुक्त मोहिम राबविण्यात येत आहे .मात्र व्यसनमुक्त समाज व देश निर्माण करण्यासाठी नुसते पोलिस विभागच नव्हे तर शासन, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्रितपणे पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे.असे मौलिक मत नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. व्यसनमुक्त समाज घडविणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त वरील देण्यात आला.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, दरवर्षी जगभरात लाखो लोकांचा मृत्यू अमली पदार्थांच्या सेवनामुळे होतो.बहुतेक नागरिक विविध व्यसनांच्या आहारी गेले असून, त्याचे दुष्परिणाम केवळ व्यक्तीपुरते मर्यादित राहत नाहीत. कुटुंबातील तणाव, आर्थिक संकट, गुन्हेगारी, अपघात आणि सामाजिक अधोगती यासारख्या गंभीर समस्यांना व्यसन कारणीभूत ठरत आहे.
विशेषतः दारू, तंबाखू, गुटखा, गांजा आणि ड्रग्जच्या विळख्यात अल्पवयीन युवक अडकत असल्याची बाब चिंताजनक आहे. त्यामुळे पालकांनी मुलांशी सातत्याने संवाद साधणे, त्यांच्या मित्रपरिवारावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
व्यसन हा व्यक्तीचा दोष नसून तो मानसिक, सामाजिक आणि आरोग्याशी संबंधित आजार आहे. त्यामुळे व्यसनाधीन व्यक्तींना दोष देण्याऐवजी त्यांना समुपदेशन, उपचार आणि पुनर्वसनाची संधी देणे आवश्यक आहे. समाजानेही अशा व्यक्तींना आधार देत व्यसनमुक्तीच्या प्रवासात साथ देण्याची गरज आहे.
“व्यसनाला नकार, आरोग्याला होकार” हा संदेश प्रत्येकाने आपल्या जीवनात स्वीकारला, तरच खऱ्या अर्थाने ‘नशामुक्त भारत’ घडविण्याचे स्वप्न साकार होईल. व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःपासून आणि आपल्या कुटुंबापासून सकारात्मक बदलाची सुरुवात करावी, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांनी केले आहे.




