spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेसाठी राजकीय पक्ष प्रतिनिधीकाऱ्यासोबत तहसिलदार ची समन्वय बैठक 

– राजकीय पक्षांसोबत प्रशासनाचा समन्वय

– मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक व सर्वसमावेशक करण्यावर भर

कामठी :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसएसआर) मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी तहसिलदार गणेश जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली कामठी तहसील कार्यालयात विविध मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक पार पडली.

याप्रसंगी बैठकीत मतदार यादीतील अचूकता वाढविणे, नवमतदारांची नोंदणी, पात्र नागरिकांचा समावेश, मृत व स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे तसेच यादीतील त्रुटी दूर करण्याच्या प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मतदार यादी अधिक पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी राजकीय पक्षांचे सक्रिय सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

तहसीलदार गणेश जगदाळे यांनी सर्व संबंधितांनी पुनरीक्षण प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळावा आणि मतदार यादी त्रुटीमुक्त व्हावी, यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

बैठकीदरम्यान विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सूचना व मुद्दे मांडले. त्यावर निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सविस्तर मार्गदर्शन करून उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशासन आणि राजकीय पक्षांनी संयुक्तपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

मतदार यादीची अचूकता आणि लोकशाही प्रक्रियेची विश्वासार्हता वाढविण्याच्या दृष्टीने ही समन्वय बैठक महत्त्वपूर्ण ठरली. बैठकीत माजी जी प सदस्य दिनेश ढोले, अनंता वाघ, धीरज यादव, ब्रह्मा काळे, अलंकार गजभिये, सचिन घोडमारे, लतेश्वरी काळे आदी उपस्थित होते.

Popular Articles