कामठी :- कामठी नगर परिषद तर्फे 15 जून पासून कामठी शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने महत्त्वाचा ब्रेक लावत संबंधित जागेवर ‘स्टेटस क्वो’ (जैसे थे) राखण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे संबंधित व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कामठी नगर परिषदेकडून रस्ते मोकळे करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत होती. मात्र, आवश्यक कायदेशीर प्रक्रिया न पाळता कारवाई केल्याचा आरोप करत समाजसेवक शकिबुर रहमान यांच्या पुढाकारातून काही दुकानदारांनी न्यायालयात धाव घेतली. यावर सुनावणीदरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून अंतिम निर्णय होईपर्यंत संबंधित जागेची सद्यस्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले.
नगर परिषदेचे म्हणणे आहे की शहराच्या विकासाच्या दृष्टीने आणि नागरिकांच्या सोयीसाठी ही मोहीम राबविण्यात येत असून ती नियमानुसारच सुरू आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशाचा पूर्ण आदर राखत संबंधित ठिकाणी पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, या निर्णयामुळे शहरातील अतिक्रमणविरोधी मोहिमेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून, व्यापारी आणि नागरिकांचे लक्ष आता न्यायालयाच्या पुढील सुनावणीकडे लागले आहे. अंतिम निर्णयानंतरच या प्रकरणाचे भवितव्य निश्चित होणार आहे.




