spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पहिल्याच दिवशी मनपा शाळेत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

– शाळेत विद्यार्थ्यांचा नवा उत्साह आणि किलबिलाट

नागपूर :-  नागपूर महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्यानंतर पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा नवा उत्साह आणि किलबिलाट पाहायला मिळाला. शाळेच्या पहिल्या दिवशी ‘प्रवेशोत्सव’ मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेत येणाऱ्या चिमुकल्यांवर पुष्पवर्षाव करण्यात आला, तसेच नवीन पुस्तके व शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आली. या जंगी स्वागतामुळे विद्यार्थी भारावले. एका नव्या ऊर्जेसह मनपा शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची दणक्यात सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते पाटी पुजा करण्यात आली.

‘शाळा प्रवेशोत्सवाचा’ मुख्य कार्यक्रम कळमना डिप्टी सिग्नल येथील पीएम श्री संजयनगर हिंदी प्राथमिक व माध्यमिक शाळेत आयोजित करण्यात आला. मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी यांनी डिप्टी सिग्नल येथील पीएम श्री संजयनगर हिंदी उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात भाग घेत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त मुरगानंथम, शिक्षण सभापती संतोष देवी लढ्ढा, कर आकारणी व कर संकलन समिती सभापती सरिता कावरे, नगरसेविका  दुर्गेश्वरी कोसेकर, नगरसेवक अरुण हारोडे उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, , शिक्षणाधिकारी  माधुरी काटकर, सहायक आयुक्त विजय थूल, हरीश राऊत, शाळा निरीक्षक अंजुम आरा, मुख्याध्यापक  गिता दांडेकर यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय मनपाच्या इतर शाळेतील प्रवेशोत्सव कार्यक्रमात झोन सभापती, स्थानिक नगरसेवक, उपायुक्त, सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता यांच्यासह इतर अधिकारी यांनी सहभाग नोंदविला.

पीएम श्री संजयनगर हिंदी प्राथमिक व माध्यमिक शाळेत मनपा आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त मुरगानंथम, शिक्षण सभापती संतोष देवी लढ्ढा, कर आकारणी व कर संकलन समिती सभापती सरिता कावरे यांच्या हस्ते पाचवी तसेच बालवाडीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक आणि शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.

नागपूर महानगरपालिकेतर्फे शाळेचा पहिला दिवस विद्यार्थी, शिक्षक, पालक या सर्वांसाठी अविस्मरणीय ठरावा, विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची हुरहूर लागावी, शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित व्हावा यासाठी मनपाच्या 84 प्राथमिक व 28 माध्यमिक अशा एकूण 112 शाळांमध्ये शाळेचा पहिला दिवस ‘प्रवेशोत्सव’ म्हणून साजरा करण्यात आला.या शाळांमध्ये एकूण 13 हजार 912 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

शाळांमध्ये पायाभूत सुविधासह, गुणवत्ता शिक्षणावर भर- संतोष देवी लढ्ढा

शिक्षण सभापती संतोषदेवी लढ्ढा यांनी पहिल्याच दिवशी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत करून त्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मनपा शाळांमध्ये गुणवत्तेची वाढ करण्यासोबतच शाळेची सुरक्षा, बालवाडीत शिकणाऱ्या लहान मुलांसाठी आवश्यक मनुष्यबळ आणि इतर पायाभूत सुविधा वाढविण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच, मनपाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षणासह अधिकाधिक चांगल्या आणि आधुनिक सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

अमृत वर्षी मनपा शाळांचा कायापलट करणार- मनपा आयुक्त डॉ. विपीन

यावेळी मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी सांगितले की, मनपाचे हे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने, शहरातील मैदाने आणि उद्यानांच्या धर्तीवरच पुढील शैक्षणिक सत्रापर्यंत मनपाच्या सर्व शाळांचा कायापालट करण्यात येईल. शाळेत आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधा व खाजगी शाळेच्या धर्तीवर इतर सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच, शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकडे विशेष लक्ष दिले जाईल. नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना क्रीडा, कौशल्य विकास आणि परदेशी भाषांचे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाईल. यामुळे खाजगी शाळांच्या स्पर्धेत मनपा शाळा कुठेही कमी पडणार नाहीत. भविष्यात मनपा शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांच्या रांगा लागतील, अशा पद्धतीने शाळांचा विकास करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शासकीय शाळा आणि महाविद्यालयांतून शिक्षण घेऊन अनेक जण मोठे अधिकारी झाले आहेत. त्यामुळे शासकीय शाळांमध्ये पायाभूत सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही आमची मोठी जबाबदारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. खाजगी शाळांच्या तुलनेत शासकीय शाळांमधील शिक्षकांची गुणवत्ता अधिक चांगली असते. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पूरक वातावरण मिळाले, तर ते खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा कुठेही मागे पडणार नाहीत, उलट त्यांना तगडी टक्कर देऊ शकतील. कमी सुविधा असतानाही जर आपले विद्यार्थी उत्कृष्ट कामगिरी करू शकतात, तर अधिक सुविधा मिळाल्यास ते प्रत्येक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवतील, असा विश्वास मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी व्यक्त केला. यासोबतच, मनपाच्या वतीने इंग्रजी आणि सीबीएसई शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, तसेच सीएसआर फंडातून शाळेतील मैदानांचाही विकास करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त मुरुगानंथम यांनीही शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी खेळासोबतच अभ्यासावरही विशेष लक्ष केंद्रित केले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. मन लावून अभ्यास करून आणि मोठे होऊन विद्यार्थ्यांनी आपली शाळा, शिक्षक तसेच आपल्या आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कर आकारणी व कर संकलन समितीच्या सभापती  सरिता कावरे यांनी पीएम संजयनगर मनपा शाळेचे कौतुक करताना सांगितले की, या शाळेतील माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनीही उत्तम शिक्षण घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करावे, असा सल्ला देत त्यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्रासाठी शुभेच्छा दिल्या.

नगरसेविका दुर्गेश्वरी कोसेकर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासात परिश्रम घेण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी असे यश संपादन करावे, ज्याचा त्यांच्या शिक्षकांना सार्थ अभिमान वाटेल आणि स्वतःचाही नावलौकिक होईल, असे मार्गदर्शन त्यांनी केले. यावेळी नगरसेवक अरुण हारोडे यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पाहिल्या दिवशी नियमित शाळेत प्रार्थनेने शाळेची सुरुवात झाली. त्यानंतर शिक्षकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबाचे पुष्प भेट देण्यात आले. याशिवाय शाळेच्या पहिल्या दिवशी बालवाडीपासून ते इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक आणि शालेय साहित्य देण्यात आले. प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापक गिता दांडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन शाळेच्या शिक्षिका  रवी खंडाईत, यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार मिनाक्षी भोयर मानले. यावेळी मनपा आयुक्त यांच्या हस्ते शिक्षणाधिकारी माधुरी काटकार यांच्या सेवानिवृत्ती निमित्‍ शाळेत सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले.

आयुक्तांसह, पदाधिकारी यांच्यासह विद्यार्थ्यांनी काढली सेल्फी

शैक्षणिक आयुष्यातील हा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यासाठी आठवण म्हणून पी एम संजय नगर शाळेतर्फे सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले होते. यावेळी यावेळी मनपा आयुक्त डॉ. विपीन अतिरिक्त आयुक्त मुरुगानंथम, शिक्षण सभापती संतोष देवी लढ्ढा, कर आकारणी व कर संकलन समिती सभापती सरिता कावरे, नगरसेविका दुर्गेश्वरी कोसेकर यांनी विद्यार्थ्यांसह सेल्फी काढली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.