spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

“माझा व्हायब्रंट व स्मार्ट” प्रभागासाठी अभिनव स्पर्धा

– स्मार्ट, शाश्वत व पर्यावरणपूरक मानकांवर राहणार भर

– अर्थसंकल्पात तरतूद : 50 लाख रुपयांचा प्रभागाला पुरस्कार

नागपूर :- शहरातील प्रभाग व मोहल्ला स्मार्ट, शाश्वत व पर्यावरणपूरक तत्वावर विकसित करण्यासाठी माझा व्हायब्रंट व स्मार्ट प्रभागासाठी अभिनव स्पर्धा मनपातर्फे आयोजित करण्यात येईल. यातील पहिल्या क्रमांकाच्या प्रभागाच्या विकासासाठी अतिरिक्त 50 लाख रुपयांचा निधी देण्याचे स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी अर्थसंकल्पात प्रस्तावित केले आहे.

महापौर निता ठाकरे यांच्या नेतृत्वात व उपमहापौर लिला हाथीबेड, सत्तापक्षनेता नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्या मार्गदर्शनात स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात ही अभिनव योजना सादर केली आहे. या योजनेअंतर्गत स्मार्ट, शाश्वत, पर्यावरणपूरक तत्वावर आधारित योजना लागू करण्यावर भर राहणार आहे. याशिवाय मालमत्ता कर संकलन, पाणी कर संकलनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रभागांची या पुरस्कारासाठी नोंद घेतली जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शहरातील सर्व ३८ प्रभागासाठी ही स्वच्छ मोहल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल, असा मानस व्यक्त केला आहे.

त्याचप्रमाणे “मी माझ्या गल्लीचा ॲम्बेसेडर” ही भावना प्रत्येकाच्या मनात तयार करण्याचे आवाहन केले आहे. आपण राहत असलेली गल्ली, भाग, वस्ती, स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नागरिकांनी घेण्याची आवश्यकता आहे. या सर्व उपक्रमातून माझे शहर-स्वच्छ शहर ही भावना रूजवून नागपूर शहरातील हरित आच्छादन वाढविणे व शहर पर्यावरणपूरक करण्यावर भर राहणार आहे. सर्व नगरसेवकांनी पुढाकार घेऊन याकामी सामुहिक संकल्प घेण्याचे आवाहन यात करण्यात आले आहे.

चांगल्या प्रशासनाचा पाठपुरावा

शहरात असलेल्या नामांकित संस्थांमधील मनुष्यबळाचा वापर करून महानगरपालिकेत सुरू असलेल्या घडामोडींचा अभ्यास करून सुशासनाच्या संदर्भात मिळणाऱ्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारामुळे शहरात अनेक नामवंत संस्था आल्या आहेत. यात इंडीयन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयएमआय), ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस, सिम्बॉयसीस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आदी संस्थांचा समावेश आहे. या संस्थांमध्ये होणारे संशोधन व तेथील कौशल्याचा उपयोग नागपूर मनपाच्या प्रशासनात सुसूत्रता आणण्यासाठी आयएमआयसोबत एक सामंजस्य करार करण्यात येणार आहे.

याअंतर्गत मनपात होत असलेल्या घडामोडींचा सखोल अभ्यास करून तज्ञांकडून आवश्यक सूचना दिल्या जातील. या नामवंत संस्थांमधील इंटर्न नागपूर मनपाच्या विविध विभागांमध्ये प्रत्यक्ष काम करून अनुभव घेतील. तसेच या अनुभवाच्या आधारावर मनपाच्या प्रशासनाला सूचना व मार्गदर्शन मिळेल. यानंतर इम्पॅक्ट अनालिसीस व जगभरातील उत्कृष्ट पद्धतीचा अभ्यास करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असा मानस स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे यांनी अर्थसंकल्पात व्यक्त केला आहे.

स्टार्टअप उभारणार

नागपूर शहरात जेनझी साठी प्रामुख्याने स्टार्टअप उभारावे, यासाठी स्टार्टअप इनक्युबेशन सेंटरची घोषणा या अर्थसंकल्पात केली आहे. या अर्थसंकल्पात मनपातर्फे जमशेटजी टाटा इनक्युबेशन सेंटर उभारण्याची घोषणा केली आहे. यामुळे युवकांना स्टार्टअप सुरू करण्याची संधी मिळणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.