spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शहरात अत्याधुनिक व्यापार संकुले, स्टेडियम व आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर

– शहरातील विकास कामांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आढावा

नागपूर :- नागपूर शहराचा वाढता व्याप लक्षात घेऊन शहरात अत्याधुनिक व्यापार संकुले, स्टेडियम व पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात यावा, केंद्र व राज्य सरकारकडे प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी, त्याचप्रमाणे सध्या सुरू असलेल्या कामांना गती देऊन हे प्रकल्प कालबद्धरित्या नियोजित करून मर्यादित वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश केंद्रीय परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिले.

शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल भागातील निवासस्थानी लोकप्रतिनिधी व नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हा प्रशासन आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक शनिवारी (ता. 4) पार पडली. यावेळी महापौर निता ठाकरे, खासदार माया इवनाते, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते,आमदार डॉ. परिणय फुके, माजी आमदार अनिल सोले, माजी आमदार विकास कुंभारे, उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती  शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्षनेता नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी, आयुक्त डॉ. विपीन, नासुप्रचे सभापती संजय मीना, एमएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, जिल्हाधिकारी  कुमार आशीर्वाद, डीआरएम विनायक गर्ग, मनपाच्या मुख्य अभियंता लिना उपाध्ये, एनएचएआयचे प्रकल्प संचालक जिचकार, म्हाडाचे मुख्य अधिकारी डॉ. विजय इंगोले, मनपा उपायुक्त मंगेश खवले यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

शहरात व्यापार संकुले उभारून पायाभूत विकासामध्ये भर टाकण्यासाठी काही प्रकल्प सुरू केले आहेत. ही व्यापार संकुले मनपा व एमएसआयडीसीद्वारे उभारण्यात येत आहेत. कॉटन मार्केट, संत्रा मार्केट, नेताजी मार्केट, धरमपेठेतील डिग दवाखाना, इतवारी बाजार, दही बाजार, कमाल टॉकीज चौक बाजार, शनिवार मार्केट, सक्करदरा येथील बुधवार बाजार उभारण्याचे प्रस्तावित आहे. यातून मनपाला उत्पन्न मिळेल तसेच शहरातील पायाभूत विकासामध्ये व बाजारपेठा अद्यावत होतील, असेही त्यांनी सांगितले.

मनपा व नासुप्रच्या अनेक जागांवर अतिक्रमण झालेले आहे. हे अतिक्रमण उठविण्यााठी ठोस कारवाईची आवश्यकता असून त्यापूर्वी मनपा व नासुप्रने आपआपल्या जागांचे मॅपिंग करावे, असे निर्देश केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिले. हे करताना ज्या जागेवर वास्तव्य असणाऱ्या रहिवाशांचे पुनर्वसनाचा प्रश्नही निकाली काढण्यासाठी उपाययोजना कराव्या, असेही त्यानी सुचविले.

गांधीबाग परिसरातील सोख्ता भवन मनपातर्फे विकसित करण्यात येणार असून या प्रकल्पाचे भूमिपूजन लवकरच करण्यासाठी सज्ज असल्याची माहिती आयुक्त डॉ. विपीन यांनी यावेळी दिली.

सुभाष मार्गावर म्हाडाच्या जागेवर आधुनिक टेक्सस्टाईल मार्केट उभारण्यात येणार आहे. या मार्केटमध्ये वैविध्य ठेवावे, यामुळे गांधीबाग येथे होणारी गर्दी कमी होण्यास मदत होईल व बाहेर गावावरून येणाऱ्या ग्राहकांना सुद्ध या मार्केटमध्ये खरेदी करणे सोईचे होणार आहे.

बस स्थानक परिसर विकसित होणार

गणेशपेठ येथील बस स्थानक समोरील शेतकरी भवन, शिक्षक भवन, अग्निशमन केंद्राची असलेली जागा विकसित करण्याच्या योजनेवर सुद्धा या बैठकीत चर्चा झाली. या संदर्भात सविस्तर डिझाईन करण्यात यावे, अशी सूचना केंद्रीय मंत्री गडकरी यानी केली.

गणेशपेठमध्ये असलेली मनपाच्या साखरे गुरुजी शाळेची इमारतीच्या जागेवर तेथे शाळा कायम ठेऊन क्रीडा संकुल विकसित करण्यात यावा असे निर्देश देण्यात आले.

यशवंत स्टेडियम तसेच चिटणीस पार्क विकसित करण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. चिटणीस पार्कमध्ये देशी खेळांसाठी मैदाने तसेच उत्तम पार्किंग तयार करण्याची सूचना नितीन गडकरी यांनी केली. त्याचप्रमाणे वाठोडा येथील साई परिसरातील संरक्षण भिंत तयार करण्याच्या कामाला गती द्यावी तसेच तेथे असलेले अतिक्रमणे काढण्याची कारवाई करावी, असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. पारडी मार्केट विकसित करताना तेथे फूड पार्क तयार करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्र्यांनी केली.

त्याचप्रमाणे तहसील पोलीस स्टेशन, गणेशपेठ पोलीस स्टेशनची उभारणी करणे त्याचप्रमाणे जुना सुभेदार, रघुजीनगरच्या जागांवर पोलिसांसाठी गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यावर चर्चा करण्यात आली. मोरभवन व गणेशपेठ बस स्थानके विकसित करणे त्याचप्रमाणे यशवंत स्टेडियम विकसित करण्यावर चर्चा करण्यात आली.

मनीषनगर ते हॉटेल प्राईड मेट्रो स्टेशनपर्यंत फूटब्रिज तयार करणे, सक्करदरा तलावात नासुप्रतर्फे बांधण्यात येणार्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे बांधकाम व सौंदर्यीकरणाच्या कामावर चर्चा करण्यात आली.

तत्पूर्वी महारेलच्या सुरू असलेल्या कामांचा मोमीनपुरा व अजनी रेल्वे स्टेशन आरओबी हसनबागतून निर्मल नगरी उड्डाणपूल जगनाडे चौक उड्डाणपूल यांच्या सध्या स्थितीचा आढावा देखील मंत्रिमहोदयांनी घेतला.यावेळी एमडी जयस्वाल व इतर उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.