spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अखेर सत्याचा विजय! स्थानिक नागरिकांच्या सहा वर्षांच्या कायदेशीर लढ्याला यश

– महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने जुन्या स्थानिक कार्यकारिणीला दिली मान्यता; दर्ग्याचा ताबा विधिवत हस्तांतरित

खापा, वार्ताहर :- खापा शहरातील ऐतिहासिक व श्रद्धास्थान असलेल्या महाराष्ट्र राज्य पर्यटन स्थळ क दर्जा प्राप्त शहरातील प्रसिद्ध दर्गा हजरत बाबा सैय्यद लष्कर शाह शहीद दर्गा व्यवस्थापनाबाबत गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेल्या वादाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने सर्व कागदपत्रे, नोंदी व कायदेशीर बाबींची पडताळणी करून जुन्या स्थानिक कार्यकारिणीला पुन्हा कायदेशीर मान्यता दिली असून, दर्ग्याचा कारभार त्यांच्या ताब्यात देण्याचे आदेश जारी केले आहेत.

सन २०१९–२० मध्ये स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता काही स्थानिक व काही शहराबाहेरील व्यक्तींनी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे समिती नोंदणीचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रक्रियेत स्थानिक नागरिकांची दिशाभूल झाल्याचा तसेच वस्तुस्थिती लपविण्यात आल्याचा आरोप करत नागरिकांनी या निर्णयाला कायदेशीर आव्हान दिले. त्यानंतर महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळासमोर सुमारे पाच ते सहा वर्षे सातत्याने कायदेशीर लढा सुरू राहिला.

या संपूर्ण प्रकरणाचा सखोल विचार करून महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने १ जुलै २०२६ रोजी आदेश काढत पूर्वीची स्थानिक कार्यकारिणीच वैध असल्याचे मान्य केले आणि त्यांनाच पुढील कारभाराची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय दिला.

या आदेशानंतर आवश्यक शासकीय प्रक्रिया पूर्ण करून गुरुवार, दि. २ जुलै २०२६ रोजी नव्याने मान्यता प्राप्त कार्यकारिणीने दर्ग्याचा विधिवत ताबा स्वीकारला. यावेळी हजरत बाबा सैय्यद लष्कर शाह शहीद यांच्या पवित्र मजारवर फुलांची चादर अर्पण करण्यात आली. फातेहा पठण करून शहर, राज्य आणि देशात शांतता, सलोखा, प्रगती व बंधुभाव नांदावा, अशी विशेष दुआ करण्यात आली. तसेच उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांच्या न्याय्य लढ्याला यश मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, दर्ग्याच्या परंपरा, धार्मिक व्यवस्थापन आणि स्थानिक सहभागाला न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

यावेळी नगराध्यक्ष पियुष बुरडे, नगरसेवक नामदेव गजभिये, प्रशांत तुमाने, हाजी अल्ताफ (बब्लू) शेख, इस्माईल (बब्बू) शेख, प्यारु शेख, युनूस कुरेशी, आसिफ शेख, साकीर शेख, गुड्डू पठाण, असलम शाह, काशिफ सुभेदार, फिरोज शेख, साहिल शेख, जाकीर शाह, मकसूद शेख, रोशन कामडी, प्रज्वल बुरडे, अनुराग बुरडे, नारायण लांबट, शब्बीर मलंग बावा, अफसर छवारे, रफिक शेख, शकूर शेख, हाजी गफ्फार शेख, मेहबूब शेख, जब्बार शेख, महेश लांबट, शाहिद खान, शहाबाज शेख यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, बाबांचे सेवेकरी आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

स्थानिक नागरिकांच्या सातत्यपूर्ण कायदेशीर लढ्यामुळे अखेर सत्याचा विजय झाला असून, न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.