– राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा कृषी कार्यालयावर ठिय्या !
– कृषी अधिकाऱ्यांना नेले शेतकऱ्यांच्या बांधावर !
– मोर्शी तालुक्यातील शेकडो हेक्टर जमिनीवरील सोयाबीन बियाणे उगवलेच नाही !
मोर्शी तालुका प्रतिनिधी :- अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना बुस्टर कंपनीच्या ‘हुतूतू’ बोगस सोयाबीन बियाणे न उगवल्यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्यामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्यामुळे बुस्टर कंपनी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस हितेश साबळे आणि तालुकाध्यक्ष रुपेश वाळके यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी मोर्शी तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करत तालुका कृषी अधिकाऱ्यांना मौजा लाडकी, कशीमपूर, खोपडा शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधावर नेऊन संबंधित शेतांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून बुस्टर कंपनीविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली.
मोर्शी तालुक्यातील मौजा लाडकी, कशीमपूर, खोपडा, तरोडा यासह तालुक्यातील विविध भागातील शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन मोठ्या आशेने बुस्टर कंपनीच्या ‘हुतूतू’ सोयाबीन बियाणे शेतामध्ये पेरले पेरणीनंतर दहा दिवसांपेक्षा अधिक काळ लोटूनही अनेक शेतांमध्ये उगवण न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून हवालदिल झाला आहे.

आधीच वाढलेला उत्पादन खर्च, महागडी बियाणे, खतांच्या किमती आणि अनिश्चित पाऊस यामुळे शेतकरी अडचणीत असताना बुस्टर कंपनीच्या निकृष्ट दर्जाच्या बियाण्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे त्यामुळे बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी तालुका कृषी अधिकारी प्रथमेश माने यांना निवेदन देऊन करण्यात आली त्यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस हितेश साबळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके, कार्याध्यक्ष हितेश उंदरे, वैभव कोंडे, सुरेश टेकाडे, रमेश टेकाडे, तेजस वडे, प्रथमेश वानखडे, अजय वानखडे, हरीश निशाण, दिनेश वडे, आकाश साबळे, योगेश राऊत, नितीन राऊत, नितीन कोहळे, नितीन गावंडे, तुळशीदास टेकाडे, दिनेश टाके यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर कठोर व कायमस्वरूपी कारवाई करा !
बुस्टर कंपनी तर्फे विक्री करण्यात आलेले बोगस सोयाबीन बियाणे हे प्रकरण केवळ एका कंपनीपुरते मर्यादित नसून, शेतकऱ्यांच्या विश्वासाशी संबंधित आहे. जर या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तर शेतकऱ्यांचा शासन व बियाणे व्यवस्थेवरील विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही. रुपेश वाळके अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना कंपनीला काळ्या यादीत टाका !
बुस्टर कंपनीच्या ‘हुतूतू’ बियाण्याची स्वतंत्र प्रयोगशाळेत तपासणी करावी. संबंधित कंपनी, वितरक व विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्या कंपनीला काळ्या यादीत टाकून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक नुकसानभरपाई द्यावी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे व आर्थिक मदत जाहीर करावी.
– हितेश साबळे सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस.




